Coronavirus: भारतात पहिल्यांदाच कोरोना विषाणू सक्रीय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ; देशाचा Recovery Rate 48.88 टक्के
देशात कोरोना व्हायरसची संक्रमितांची संख्या वाढून 2 लाख 76 हजार 583 झाली आहे. 24 तासांत देशात कोरोनाची 9985 नवीन प्रकरणे आढळली आहेत
लॉक डाऊनचे नियम शिथिल झाल्यावर कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या हा एक चिंतेचा विषय बनला आहे. देशात कोरोना व्हायरसची संक्रमितांची संख्या वाढून 2 लाख 76 हजार 583 झाली आहे. 24 तासांत देशात कोरोनाची 9985 नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की, देशात प्रथमच कोरोना सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाचे एक लाख 33, 632 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर एक लाख 35, 205 लोक यातून बरे झाले आहेत. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 7,745 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
आकडेवारीनुसार देशात कोरोनाची सर्वाधिक सक्रिय प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रुग्णालयांमध्ये 45 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर दिल्ली, तिसर्या क्रमांकावर तामिळनाडू, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यात कोविड-19 रुग्ण सर्वाधिक आहेत. सध्या जगामध्ये कोरोना विषाणू संक्रमणाच्या बाबतील भारताचा पाचवा क्रमांक आहे. जरी भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वेगाने वाढत असली, तरी देशाचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. सध्या, देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 48.88% आहे. (हेही वाचा: धारावी सह मुंबई शहरातील कोरोना व्हायरसचा वेग मंदावल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी दिले हे '4' महत्त्वाचे अपडेट्स!)
देशात आयसीएमआरद्वारे दररोज सॅम्पल टेस्टिंगची संख्या वाढविली जात आहे. देशातील खाजगी आणि सरकारी दोन्ही प्रयोगशाळांमध्ये कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येत आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत 50,61,332 नमुने चाचण्या घेण्यात आल्या आहेत. worldometers.info च्या माहितीनुसार, आता जगभरामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 7,323,516 पर्यंत पोहचला आहे. तर 413,731 जणांनी आपला जीव गमावला आहे. संक्रमणांच्या बाबतीत काल मुंबईने चीनच्या वूहान शहराला मागे टाकले, तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने चीनला मागे टाकले.