औषधाची गॅरेंटी तरीही टक्कलावर उगवले नाहीत केस; कंपनीला १४ हजार रुपयांचा दंड
तसेच केस गळून टक्कल पडलेल्या ठिकाणी नवे केसही येतील.
आपल्या औषधामुळे केसगळती थांबणार व डोक्याच्या टक्कलावर शंभर टक्के केस येणार, अशी गॅरेंटी देणे राजधानी दिल्लीतील एका औषध कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. सदर कंपनीला एका ग्राहकाने ग्राहक न्यायालयात खेचले. इतकेच नव्हे तर, न्यायालयानेही कंपनीची चुक असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच, याचिकाकर्त्या ग्राहकास झालेल्या फसवणुकीची भरपाई म्हणून १४ हजार रुपये देण्याचे आदेशही कंपनीला दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, संदीप वर्मा असे याचिकाकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. ते मुळचे पंजाब येथील मोहालीचे राहणारे आहेत. संदीप वर्मा यांनी चंडीगढ येथील ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. ज्यात संदीपने गुडगाव येथील Geek Retail Private Limeted या कंपनीवर खोटा प्रचार आणि फसवणुकीचा आरोप ठेवत खटला दाखल केला होता. आपल्या याचिकेत संदीप यांनी म्हटले होते की, कंपनीने आपल्या जाहिरातीत दावा केला होता की, आपल्या कंपनीच्या औषधांचा ३० दिवसांचा कोर्स केल्यास केसगळतीपासून सुटका मिळेल. तसेच केस गळून टक्कल पडलेल्या ठिकाणी नवे केसही येतील.
दरम्यान, कंपनीची जाहीरात पाहून संदीप वर्मा यांनी १२७० रुपयांचे औषध ऑर्डर केले. ऑर्डर केल्यानुसार औषध तर आले. तसेच, औषध घेतल्याव उगवणाऱ्या केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत देण्यात आलेल्या गोळ्याही त्यांनी मागवल्या. या गोळ्यांची किंमत १२७० आणि १८८० रुपये इतकी होती. दरम्यान, संदीप यांनी औषध नियमीतपणे घेतले. मात्र, त्याचा काहीच फायदा त्यांना झाला नाही. ना त्यांचे केसगळणे थांबले, ना त्यांच्या टक्कलावर केस उगवले.
दरम्यान, औषधाचा गुणच न आल्याने संदीप यांनी संबधीत कंपनीकडे पैसे परत मागितले. पण, ते देण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे संदीप यांनी चंडीगढ येथील ग्राहक न्यायालयात दाद मागितली. ग्राहक न्यायालयात याचिका दाखल होताच संबंधीत कंपनीने आपण केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलावर केस परत उगवतील असा कोणताही दावा जाहिरातीत केला नसल्याचे सांगितले. तसेच, औषधाच्या परिणामाबाबतही कंपनीकडून कोणतीही गॅरेंटी देण्यात आली नसल्याचे सांगितले. पुढे कंपनीने आपल्या उत्तरात असेही म्हटले की, औषधाचा परिणाम हा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. आमच्या अभ्यासानुसार काही लोकांना ६० दिसांत केस आले तर, काहींना त्याहूनही विलंब लागला.
दरम्यान, दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यावर ग्राहक न्यायालयाने निर्णय दिला की, कंपनीकडून करण्यात आलेल्या ६० दिवसांत केस उगवण्याबाबतचा मुद्दा स्वीकारार्ह नाही. कंपनीने औषध विक्री करताना ग्राहकाची फसवणूक केली आहे. त्यामुळे औषध कंपनीने ग्राहक संदीप वर्मा यांना औषधांची ऑर्डर करताना कंपनीला दिलेले ४४२० रुपये परत करावेत. तसेच, खटला दाखल करण्यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम म्हणून ५००० रुपये द्यावेत. तसेच, नुकसानभरपाई म्हणूनही ५००० हजार रुपये असे सर्व मिळून १४४२० रुपये ग्राहकास द्यावेत असे आदेश दिले.