अर्नब गोस्वामीला विमानात उद्धटपणे प्रश्न विचारणे पडले महागात; कॉमेडियन कुणाल कामरवर IndiGo, Air India, SpiceJet कडून बंदी (Video)

कुणालच्या वागणुकीमुळे इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाईस जेटने त्याच्यावर विमानात चढण्यापासून बंदी घातली आहे

TV presenter Arnab Goswami and standup comedian Kunal Kamra. (Photo Credit: Wikimedia Commons/ Twitter)

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना उद्धटपणे प्रश्न विचारल्याने विनोदकार कुणाल कामरा (Kunal Kamra) मोठ्या अडचणीत आला आहे. कुणालच्या वागणुकीमुळे इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाईस जेटने त्याच्यावर विमानात चढण्यापासून  बंदी घातली आहे. इंडिगोने कामराला सहा महिन्यांसाठी आणि एअर इंडियाने पुढील आदेश होईपर्यंत प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

कुणाल कामरा आणि अर्नब गोस्वामी एकाच विमानाने मुंबईहून लखनऊला जात होते. त्यावेळी या दोघांमध्ये जो वाद झाला त्यावरुन आता राजकारण तापले आहे. मात्र कामाराच्या या बंदीचा कॉंग्रेसने निषेध केला आहे.

मंगळवारी सायंकाळी कॉमेडियन कुणाल कामरा आणि पत्रकार अर्नब गोस्वामी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कुणाल अर्नबला लक्ष्य करताना काही प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र, संपूर्ण व्हिडीओमध्ये अर्नब पूर्णतः शांत बसून राहिला. कुणालने अर्नबला प्रश्न विचारत हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर चहूबाजूंनी कुणालवर टीका व्हायला सुरुवात झाली. त्यानंतरही परतीच्या प्रवासात दोघे एकत्र होते. तेव्हाही कुणालने अर्नबशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र अर्नबने त्यास नकार दिला. (हेही वाचा: विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !)

या वादानंतर केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी घटनेची दखल घेत, भारताच्या इतर विमान कंपन्यांनाही कामरावर अशीच बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत ते म्हणाले, 'प्रक्षोभक बोलणे आणि विमानामध्ये अराजक निर्माण करणारे आक्षेपार्ह वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे. यामुळे हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवास धोका आहे.' इंडिगोनेही ट्वीट करत आपल्या इतर प्रवाशांना अशी वागणूक न करण्याचा सल्ला दिला आहे.