Shocking! दोन मुलांनी आईची लावून दिली 6 लग्ने; समोर आले धक्कादायक कारण

पोलिसांनी आशा शर्माचे साथीदार राहुल आणि आशिष यांचा शोध सुरू केला. ते सागर येथे लपून बसल्याचे समोर आले

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिलासपूर (Bilaspur) पोलिसांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एका टोळीतील 2 जणांना अटक केली आहे. आईसह 2 मुले ही टोळी चालवत होते. अगदी फिल्मी स्टाइलमध्ये ही टोळी लुटमार करत होती. फसवणूक आणि लुटण्याच्या इराद्याने दोन्ही मुलांनी आईची 6 लग्ने लावून दिली होती. बहुतेक प्रकरणांमध्ये, हनिमूननंतर नवरा आणि त्याच्या कुटुंबाला लुटून हे पळून जात असत. बिलासपूरमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात लग्नाच्या 22 महिन्यांत आरोपींनी एका वृद्ध व्यक्तीला लुटले होते.

बिलासपूर पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना मध्य प्रदेशातील सागर येथून अटक केली आहे. या टोळीचा मुख्य म्होरक्या यापूर्वीच लुटमार आणि फसवणुकीप्रकरणी राजस्थानच्या तुरुंगात आहे. बिलासपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 78 वर्षीय मुन्शीलाल पस्तारिया यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी सांगितले की, 2016 मध्ये त्यांनी वर्तमानपत्रात आपल्या लग्नाशी संबंधित एक जाहिरात दिली होती. जाहिरातीच्या आधारे, आशा शर्माने, वय 48 वर्षे, त्यांच्याशी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला.

त्यानंतर दोघांमध्ये ओळख वाढत गेली व 4 डिसेंबर 2016 रोजी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत त्यांचा भोपाळमध्ये विवाह झाला. लग्नानंतर आशा जवळपास 22 महिने तिचे दोन नातेवाईक राहुल शर्मा आणि आशिष शर्मा यांच्या संपर्कात होती. फिर्यादीनुसार, मुन्शीलाल यांचा विश्वास संपादन करून आशाने 13,69,000 रुपये रोख, सुमारे 65,000 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 10 लाखाची अल्टो कार असा ऐवज घेऊन पळ काढला. (हेही वाचा: Acid Attack: विवाहित प्रेयसीने नाते मोडल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने केला अॅसिड हल्ला, अटक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराच्या तक्रारीची शहानिशा करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची तपासणी सुरु झाली. पोलिसांनी आशा शर्माचे साथीदार राहुल आणि आशिष यांचा शोध सुरू केला. ते सागर येथे लपून बसल्याचे समोर आले. त्याठिकाणी दोघांना ताब्यात घेतले, ज्यांनी आशा शर्मा आपली आई असल्याचे सांगितले. आशाने आतापर्यंत 6 जणांशी लग्न करून फसवणूक केली आहे. चौकशीदरम्यान आशा शर्माने आपल्या दोन मुलांच्या मदतीने इंदूर, देवास, दुर्ग छग, जयपूर राजस्थान येथील लोकांशी लग्न करून फसवणूक केल्याचे सांगितले.