Rapido Driver Demands Extra Payment: रॅपिडो चालकाकडून भाड्यापेक्षा वाढीव पैशांची मागणी; चेन्नईच्या सीईओची लिंक्डइनवरील पोस्ट व्हायरल, कंपनीकडून कारवाई
ऑनलाईन कॅब बुक केल्यानंतर दिलेल्या सेवेसाठी रॅपिडो चालकाने प्रवासभाडे म्हणून निश्चित झालेल्या रकमेपेक्षा अधिक पैसै मागितल्याचा आरोप एका चेन्नईस्थित कंपनीच्या सीईओने (Chennai Ceo) केला आहे.
एमजे स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीचे सीईओ अशोक राज राजेंद्रन यांनी याबाबत लिंक्डईन पोस्ट ( Linkedin Viral Post) द्वारे तक्रार केली आहे. ज्यावर रॅपिडो कंपनीने तत्काळ प्रतिसाद देत चालकावरही कारवाई केली आहे. राजेंद्रन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहेकी, मद्रास सेंट्रल रेल्वे स्टेशन ते थोराईपक्कम पर्यंत केवळ 21 किमी अंतर आहे. ज्याचे प्रवासभाडे या या चालकाने तब्बल 1000 रुपये इतके केले.
पाणी साचल्याचे सांगून 1000 रुपयांची मागणी
रॅपिडोकडून आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल लिहीताना राजेंद्रन यांनी म्हटले की, अॅपने सुरुवातीला 21 किलोमीटरच्या प्रवासासाठी 350 रुपयांचे भाडे दर्शविले होते. जे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 400 रुपयांपर्यंत विभागून घेतले. दरम्यान, एका चालकाने विनंती स्वीकारली. परंतु त्यांच्या परिसरात कथितरित्या पावसाचे पाणी साचल्याचे सांगत त्याने या प्रवसासाठी तब्बल 1000 रुपये भाडे मिळावे असा आग्रह धरला. दरम्यान, बरीच चर्चा झाल्यानंतर 800 रुपयांवर तोडगा निघाला. पण, जेव्हा प्रवास पूर्ण झाला तेव्हा परिसरात कोणत्याही प्रकारे पाणि साचल्याचे आढळून आले नाही. (हेही वाचा, Bike Taxis in Maharashtra: रॅपिडो, ओला आणि उबेरसाठी खुशखबर; महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार बाइक टॅक्सी, सरकारकडून ग्रीन सिग्नल)
राजेंद्रन यांनी पुढे म्हटले की, दरम्यान आपण अॅपच्या माध्यमातून रॅपिडोशी संपर्क साधला. परंतू, माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. जेव्हा मी लिंक्डइनवर या समस्येबद्दल पोस्ट केले तेव्हा रॅपिडोने माझ्याशी संपर्क साधला, परतावा देऊ केला आणि ड्रायव्हरवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, असे राजेंद्रन यांनी म्हटले.
सीईओकडून कंपनीवर ताशरे
राजेंद्रनने आपल्या पोस्टमध्ये, अशा पद्धतींना परवानगी दिल्याबद्दल रॅपिडोला फटकारत, अतिरिक्त देयकांची मागणी करण्यासाठी परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या वाहनचालकांच्या पद्धतीबद्दल निराशा व्यक्त केली. "जर रॅपिडोला वाहनचालकांनी अतिरिक्त मागणी करण्याची काळजी नसेल, तर 'चालकाने अतिरिक्त पैसे मागितले का? असे विचारण्याचा पर्याय का आहे? असे दिसते की ते फक्त दाखविण्यासाठी आहे ", त्याने रॅपिडोच्या ग्राहक समर्थनासह त्याच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील समाविष्ट करून टिप्पणी केली. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
लिंक्डीन पोस्टनंतर कंपनीस जाग
व्हायरल झालेल्या पोस्टला प्रतिसाद देताना, रॅपिडोने टिप्पणी विभागात राजेंद्रनच्या चिंतेचे निराकरण केले, त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला असल्याची पुष्टी केली. तसेच, परतावा जारी केला आणि त्यात सामील असलेल्या चालकाला पुन्हा प्रशिक्षित करण्यासाठी कारवाई केली. रॅपिडोने ग्राहकांचे अनुभव सुधारण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर भर दिला आणि गरज भासल्यास पुढील मदतीसाठी संपर्क साधण्यासाठी राजेंद्रनला आमंत्रित केले.