Chardham Yatra Death Toll: अवघ्या एक दिवसात 9 जणांचा मृत्यू! चारधाम यात्रेतील आतापर्यंतची मृतांची संख्या 29 वर, आरोग्य चाचणीबाबत प्रशासन कडक
त्यापैकी 2 गुजरातचे तर एक पुणे, महाराष्ट्रातील रहिवासी होते. केदारनाथमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला.
Chardham Yatra Death Toll: चारधाम यात्रा (Chardham Yatra) सुरू झाल्याच्या 10 दिवसांत सहा लाखांहून अधिक भाविकांनी चारधामला भेट दिली आहे. यामध्ये सर्वाधिक 2.50 लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धामला भेट दिली. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाममध्ये दररोज सरासरी 70 हजारांहून अधिक भाविक येत आहेत. त्याचबरोबर चारधाम यात्रेसाठी नोंदणीची संख्या 29.52 लाखांवर पोहोचली आहे. दुसरीकडे यावेळीही उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाल्यानंतर भाविकांच्या मृत्यूची मालिका सुरू झाली आहे. एकाच दिवसात 9 जणांचा मृत्यू झाल्याने, यात्रेच्या 9 दिवसांतील मृतांची संख्या 29 वर पोहोचली आहे.
दोन दिवसांपूर्वी शनिवारी बद्रीनाथमध्ये एक आणि यमुनोत्रीमध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. त्यापैकी 2 गुजरातचे तर एक पुणे, महाराष्ट्रातील रहिवासी होते. केदारनाथमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला.
गुजरातमधील सुरत येथील रहिवासी 49 वर्षीय शशिकांत यांचा बद्रीनाथ धाम येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचवेळी गुजरातचे रहिवासी असलेले 53 वर्षीय कमलेश भाई पटेल यमुनोत्रीमध्ये वाटेत पडले. त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यमुनोत्रीला भेट देण्यासाठी आलेल्या पुण्यातील 54 वर्षीय रोहिणी दळवी यांचा उत्तरकाशीतील खराडी गावातील हॉटेल मृत्यू झाला. तीर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा: Heat Wave Alert: दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट; केरळ, तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट)
उत्तरकाशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एस. रावत यांनी सांगितले की, यमुनोत्रीमध्ये 11 आणि गंगोत्रीमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. रुद्रप्रयाग प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृतांची आकडेवारी बद्रीनाथ धाममधील आहे. अहवालानुसार, यात्रेला येणारे भाविक आरोग्य तपासणी न करताच यात्रेला आल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंना आरोग्य तपासणी करून यात्रेला येण्याचे आवाहन केले आहे. यासह वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनाने नोंदणीशिवाय प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. विविध ठिकाणी नोंदणीची तपासणी केली जात आहे.