Chandrayaan-3 Mission: इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेला मोठे यश; चंद्रावर सल्फर, ऑक्सिजनसह इतर अनेक घटकांची पुष्टी, हायड्रोजनचा शोध सुरु
त्याला सहा चाके जोडलेली आहेत. यात वीज निर्मितीसाठी सौर पॅनेलसह बॅटरीचाही समावेश आहे. रोव्हर फक्त लँडरशी संवाद साधू शकतो व पुढे लँडरद्वारे गोळा केलेली माहिती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवली जात आहे.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. इस्रोने मंगळवारी (29 ऑगस्ट) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टद्वारे सांगितले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फरच्या उपस्थितीची पुष्टी झाली आहे. यासह, भारतीय अंतराळ संस्थेने सांगितले की, आता या ठिकाणी हायड्रोजनचा शोध सुरू आहे.
इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) साधनाने प्रथमच इन-सीटू मोजमापाद्वारे, दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर उपस्थितीची निःसंदिग्धपणे पुष्टी केली आहे.’
‘सुरुवातीला चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम (Al), सल्फर (S), कॅल्शियम (Ca), लोह (Fe), क्रोमियम (Cr) आणि टायटॅनियम (Ti) ची उपस्थिती समोर आली होती. उलगडली आहे. त्यानंतर पुढील मोजमापांद्वारे मॅंगनीज (Mn), सिलिकॉन (Si) आणि ऑक्सिजन (O) ची उपस्थिती उघड झाली. आता हायड्रोजनच्या अस्तित्वाबाबत शोध सुरु आहे.’
14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 ने चंद्राकडे झेप घेतली. तब्बल 40 दिवसांच्या प्रवासानंतर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ याचे सॉफ्ट लँडिंग झाले. चांद्रयान-2 च्या लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन, चांद्रयान-3 अधिक कार्यक्षम बनवण्यात आले आहे. चांद्रयान-3 मधील मुख्य घटक रोव्हर आहे. चंद्रावर लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर, त्यातून रोव्हर बाहेर आला असून, आता तो माहिती गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. (हेही वाचा: National Space Day: चांद्रयान-3 च्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगची तारीख, 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून घोषित)
चांद्रयान-3 च्या रोव्हरचे वजन फक्त 26 किलो आहे. त्याला सहा चाके जोडलेली आहेत. यात वीज निर्मितीसाठी सौर पॅनेलसह बॅटरीचाही समावेश आहे. रोव्हर फक्त लँडरशी संवाद साधू शकतो व पुढे लँडरद्वारे गोळा केलेली माहिती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवली जात आहे. या लँडर आणि रोव्हर्सचे आयुष्य 14 दिवसांचे आहे. त्यामुळे इस्रोकडे चंद्रावरील माहिती प्राप्त करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ आहे.