Chandigarh Shocker: सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रासह शाळेतील मुलांनी केला बलात्कार; गुन्हा दाखल, आरोपींना अटक
या पाच आरोपींना ताब्यात घेऊन रविवारी (21 मे 2023) बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
चंदीगड (Chandigarh) येथील सरकारी शाळेतील विद्यार्थिनीवर शाळेतील विद्यार्थ्यांनीच बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आणि सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या या मुलीवर सर्वात आधी तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलाने बलात्कार केला. त्यानंतर नववीच्या आणखी चार विद्यार्थ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. हे प्रकरण 18 मे 2023 रोजी समोर आले. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण चंदीगडमधील सरकारी मॉडर्न स्कूलशी संबंधित आहे. पीडितेचे वय 13 वर्षे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वय 14 ते 15 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. आधी पीडितेवर तिच्या वर्गमित्राने बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. त्याने पीडितेवर चोरीचा आरोप करून तिला ब्लॅकमेल केले. तोंड बंद ठेवण्याची धमकी देऊन बलात्कार केला. नंतर त्याने आपल्या 4 मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनीही चंदीगडमध्ये वेगवेगळ्या दिवशी तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीने पीडितेवर शाळेच्या आत आणि बाहेर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही बाब शाळेतीलच एका शिक्षकाला आधी कळली. याबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना माहिती दिली. मुख्याध्यापकांनी 18 मे रोजी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचे जबाब घेतले. (हेही वाचा: अल्पवयीन मुलीची 8 वर्षांत 15 पुरुषांना विक्री; गुजरातमध्ये समोर आले मानवी तस्करीचे धक्कादायक प्रकरण)
कुटुंबीयांच्या जबाबावरून पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत आयपीसीच्या कलम 376 AB, 506 अन्वये गुन्हा दाखल केला. या पाच आरोपींना ताब्यात घेऊन रविवारी (21 मे 2023) बालसुधारगृहात पाठवण्यात आले. पीडितेचे समुपदेशन केले जात आहे. या घटनेनंतर चंदीगड बाल संरक्षण आयोगाने शाळेत बाल अदालत आयोजित केली होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत घडलेल्या गैरवर्तनाची तक्रार करण्यास प्रवृत्त करण्यात आले.