दिवाळीनिमित्त यंदा बाजारात आले इको फ्रेंडली ग्रीन फटाके; पेन्सिल, चक्र, फुलबाजी आणि सुतळी बॉम्ब यांचाही समावेश
यामध्ये पेन्सिल, फुलबाजी, सुतळी बॉम्ब, भुईचक्र या फटाक्यांचा समावेश आहे. नेहमीच्या फटाक्यांपेक्षा या फटाक्यांमुळे 30 टक्के कमी प्रदूषण होते.
दिवाळीत (Diwali) फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आण वायू प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणाला हानिकारक असे फटाके वापरू नका असा संदेश दरवर्षी दिला जातो. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण जसजसे लोकांच्या लक्षात येऊ लागले तसतसा गेल्या 1,2 वर्षांपासून फटाक्यांचा वापर कमी होताना दिसू लागलाय. मात्र अजूनही काही लोकांना हा पर्यावरणपूरक संदेश पचनी पडलेला नाही. म्हणून केंद्र सरकारने यंदा बाजारात ग्रीन फटाके आणले आहेत. यामध्ये पेन्सिल, फुलबाजी, सुतळी बॉम्ब, भुईचक्र या फटाक्यांचा समावेश आहे. नेहमीच्या फटाक्यांपेक्षा या फटाक्यांमुळे 30 टक्के कमी प्रदूषण होते.
2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने फटाक्यांवर निर्बंध घातले होते. यानंतर या ग्रीन फटाक्यांचा विचार झाला. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने अशा प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांवर महत्त्वाचं संशोधन केलं.फटाके बनवणाऱ्या कंपन्यांनीही या प्रकारचे फटाके तयार करण्यासाठी सहमती दर्शवली. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला.
ग्रीन फटाक्यांत काय असतं ?
फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण 100 टक्के कमी करता येत नाही पण या ग्रीन फटाक्यांमुळे हे प्रदूषण कमी होतं.या फटाक्यांमध्ये धूळ शोषून घेण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर या फटाक्यांमधून होणारं उत्सर्जनही कमी आहे. या फटाक्यांतून पाण्याचे कण तयार होतील. यामुळे धूळ आणि प्रदूषणकारी घटक कमी व्हायला मदत होईल. Diwali 2019 Calendar: धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ते भाऊबीज पहा यंदा दिवाळी मध्ये कोणता सण कधी?
या ग्रीन फटाक्यांवर हिरवा स्टिकर आणि बारकोड असेल. हा बारकोड स्कॅन केला तर हे फटाके नेमके कुठे तयार झाले. त्यात कोणतं रसायन आहे याची माहिती मिळेल.
नेहमी मिळणाऱ्या फटाक्यांपेक्षा हे ग्रीन फटाके थोडे महाग आहेत पण पर्यावरण रक्षणासाठी असे फटाके विकत घेणं जास्त हिताचं आहे. पर्यावरणासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हितावह असे ग्रीन फटाक्यांचा वापर करणे काही अवघड नाही. नाही का?