BJP च्या नवीन संसदीय मंडळाची घोषणा; Nitin Gadkari यांना नारळ, Devendra Fadnavis यांची निवडणूक समितीत वर्णी
तर, देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची घोषणा केली होती.
भारतीय जनता पक्षाने (BJP) नवीन संसदीय मंडळाची (Parliamentary Board) घोषणा केली आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मंडळातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर बीएस येडियुरप्पा आणि सर्बानंद सोनोवाल या नेत्यांना संसदीय मंडळात प्रवेश मिळाला आहे. शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांना केंद्रीय निवडणूक समितीतूनही वगळण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या दुसऱ्या सर्वात शक्तिशाली गटात म्हणजेच, निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे.
राजस्थानचे नेते ओम माथूर आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांचाही या मंडळात समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नवीन नवीन संसदीय मंडळामध्ये जेपी नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, बीएल संतोष (सचिव) यांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश आहे. केंद्रीय संसदीय समितीप्रमाणेच जेपी नड्डा हेच निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत.
निवडणूक समितीतील नावे-
जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बीएल संतोष, वनाथी श्रीनिवास (हेही वाचा: आपल्या मातीत खूप सामर्थ्य असून भारताचा 75 वर्षांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे - पंतप्रधान मोदी)
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तर, देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान देऊन त्यांचा दर्जा वाढवला आहे.