Biggest Stock Market Scam: 'शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा'; Rahul Gandhi यांचे PM Narendra Modi, Amit Shah यांच्यावर गंभीर आरोप, JPC चौकशीची मागणी

आम्ही याबाबत जेपीसी चौकशीची मागणी करतो. किरकोळ गुंतवणूकदारांची फसवणूक करून कोणीतरी हजारो कोटी रुपये कमावले आहे.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

Biggest Stock Market Scam: लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून यामध्ये एनडीए (NDA) सरकारला बहुमत मिळाले आहे. एकीकडे एनडीए सरकार सत्ता स्थापनेची तयारी करत असताना, दुसरीकडे गुरुवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निकालाच्या दिवशी शेअर बाजारातील प्रचंड घसरणीबाबत, भाजपवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. गांधींनी निकालाच्या दिवशी शेअर बाजारातील घसरणीला मोठा घोटाळा म्हटले असून, याबाबत त्यांनी थेट नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले आहे.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी शेअर बाजार घोटाळा केला आणि त्यात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा थेट सहभाग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेपूर्वी शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणुकीचा सल्ला दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. या प्रकरणी त्यांनी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशीची मागणी केली आहे.

पहा व्हिडिओ- 

निकालापूर्वी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांनी शेअर बाजाराबाबत वक्तव्ये का केली? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले, 'पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळी शेअर बाजारावर भाष्य केल्याचे आम्ही पहिल्यांदाच पाहिले. पंतप्रधान म्हणाले की, शेअर बाजार खूप वेगाने वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी 4 जून रोजी शेअर बाजारात तेजी येईल आणि तुम्ही सर्वांनी गुंतवणूक करावी, 4 जूनपूर्वी शेअर्स खरेदी करा असे सांगितले. अर्थमंत्र्यांनीही असेच काहीसे सांगितले.’ (हेही वाचा: Share Market Update: Chandrababu Naidu एनडीए सोबतच राहणार असल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारात सुधारली परिस्थिती

ते पुढे म्हणतात, 'पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या 5 कोटी कुटुंबांना गुंतवणुकीचा सल्ला दिला. गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का? त्यांनी याबाबतच्या  दोन्ही मुलाखती एकाच व्यावसायिक समूहाच्या मालकीच्या मीडिया हाऊसला दिल्या. भाजपला 220 जागा मिळतील असे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे स्वतःचे अंतर्गत सर्वेक्षण होते. गुप्तचर अधिकाऱ्यांनीही त्यांच्या सर्वेक्षणात भाजपला 200 ते 220 जागा मिळतील असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी सतत लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले.’

ते पुढे म्हणतत, ‘त्यांनतर 1 जून रोजी खोटे एक्झिट पोल काढण्यात आले आणि निकालाच्या दिवशी वेगळेच चित्र समोर आले. हा संपूर्ण घोटाळा आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांनी 4 जून रोजी शेअर बाजारात विक्रमी वाढ होण्याची आशा दाखवत, लोकांना शेअर्स खरेदी करण्यास सांगितले. आम्ही याबाबत जेपीसी चौकशीची मागणी करतो. किरकोळ गुंतवणूकदारांची फसवणूक करून कोणीतरी हजारो कोटी रुपये कमावले आहे.’