Biggest Car Thief: सर्वात मोठा कार चोर Anil Chauhan पोलिसांच्या ताब्यात; आतापर्यंत चोरल्या आहेत 5,000 हून अधिक गाड्या, 180 गुन्हे दाखल

त्याच्यावर उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ईशान्येकडील राज्यांतील प्रतिबंधित संघटनांना पुरवल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

देशातील सर्वात मोठा कार चोर अनिल चौहान (Anil Chauhan) याला दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली. अनिल चौहानवर 5000 कार चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, 52 वर्षीय अनिलने चोरीच्या आधारे दिल्ली, मुंबई आणि ईशान्य भागात अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या चोरीद्वारे तो तो समृद्ध जीवन जगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलला तीन बायका आणि सात मुले आहेत. हा देशातील सर्वात मोठा कार चोर असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

अनिलने 27 वर्षात 5000 हून अधिक गाड्या चोरल्या आहेत. मध्य दिल्ली पोलिसांच्या विशेष कर्मचाऱ्यांना अनिलची माहिती मिळाली होती. यानंतर त्याला देशबंधू गुप्ता रोड येथून पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून सहा पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याआधी अनिल दिल्लीच्या खानापूर भागात राहात असताना ऑटोरिक्षा चालक म्हणून काम करायचा. 1995 नंतर त्याने गाड्या चोरण्यास सुरुवात केली. त्याने 27 वर्षात सर्वाधिक मारुती 800 मॉडेल चोरले.

अनिल देशाच्या विविध भागातून गाड्या चोरून नेपाळ, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाठवायचा. चोरी करताना त्याने अनेक टॅक्सी चालकांची हत्याही केली आहे. तो मुळचा आसामचा आहे. तो राज्यात सरकारी कंत्राटदार बनला होता आणि तेथील स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होता. आसाममध्ये त्याला गेंड्याच्या शिंगांच्या तस्करीसाठी ओळखले जायचे. अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्या घरावर छापा टाकून त्याची सर्व मालमत्ता जप्त केली व त्यानंतर अनिलने चोरी करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: Pan-India Income Tax Raids: देशभरात 100 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी; अनोळखी राजकीय पक्ष रडारवर)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सध्या शस्त्रास्त्र तस्करीत गुंतला आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ईशान्येकडील राज्यांतील प्रतिबंधित संघटनांना पुरवल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. याआधी अनिलला पोलिसांनी अनेकदा अटक केली होती. 2015 मध्ये एकदा त्याला काँग्रेस आमदारासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने पाच वर्षे तुरुंगात घालवली आणि 2020 मध्ये त्याची सुटका झाली. त्याच्यावर 180 गुन्हे दाखल आहेत.