Biggest Bank Fraud: भारतामधील सर्वात मोठा बँक घोटाळा; 22,842 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी ABG Shipyard च्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

एबीजी शिपयार्डशी संबंधित फसवणूक इतकी मोठी आहे की याआधी फक्त नीरव मोदीचीच 13,200 कोटी रुपयांची फसवणूक सर्वात मोठी फसवणूक होती

fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (CBI) एका मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात जहाज बांधणी कंपनी एबीजी शिपयार्डवर (ABG Shipyard) वर कारवाई केली आहे. या कंपनीवर विविध बँकांची तब्बल 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. मीडियामध्ये उपलब्ध माहितीनुसार, एबीजी शिपयार्डने केल्या या फसवणुकीचे संपूर्ण प्रकरण 2012-17 दरम्यान मिळालेला निधी आणि त्यांच्या गैरवापराशी संबंधित आहे. आता केंद्रीय तपास यंत्रणेने एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे ​​तत्कालीन अध्यक्ष ऋषी अग्रवाल आणि इतरांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डिरेक्टर्ससोबतच अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल, रवि विमल नेवातिया आणि एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संचालकांचीही नावे एफआयआरमध्ये आहेत. माहितीनुसार, फॉरेन्सिक तपासात समोर आले आहे की, 2012-17 दरम्यान या प्रकरणातील आरोपींनी संगनमत करून बँकांमधील निधी वळवला, त्यांचा गैरवापर केला आणि गुन्हेगारी विश्वासाचा भंग केला. सुमारे 28 बँका आणि वित्तीय संस्था या घोटाळ्याला बळी पडल्या आहेत. त्यांच्याकडून घेतलेला निधी अन्य काही कामांसाठी वापरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल केली आणि एबीजी शिपयार्ड कंपनीचे 2,925 कोटी रुपये थकित असल्याचे सांगितले. याशिवाय इतर बँका जसे की ICICI बँक रु. 7,089 कोटी, IDBI बँक रु. 3,634 कोटी, बँक ऑफ बडोदा रु. 1,614 कोटी, PNB रु. 1,244 कोटी आणि IOB रु. 1,228 कोटी थकीत आहेत. एबीजी शिपयार्ड कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीची कामे करते. यांचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहेत. (हेही वाचा: SEBI Bars Anil Ambani: सेबीचा अनिल अंबानींना मोठा धक्का, रिलायन्स होम फायनान्सला बाजारात बंदी घालत केली कारवाई)

या कंपनीशी संबंधित 22,842 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी आता सीबीआय मुंबईतील एबीजी शिपयार्डशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एबीजी शिपयार्डशी संबंधित फसवणूक इतकी मोठी आहे की याआधी फक्त नीरव मोदीचीच 13,200 कोटी रुपयांची फसवणूक सर्वात मोठी फसवणूक होती. मात्र, या खुलाशानंतर भारतातील सर्वात मोठ्या बँक फ्रॉडमध्ये एबीजी शिपयार्डचे नाव घेतले जाईल.