Biggest Bank Fraud: DHFL कडून बँकांची 34,615 कोटींची फसवणूक; CBI ने दाखल केला गुन्हा
यापूर्वी 2019 मध्ये, ईडीने ऑक्टोबरमध्ये DHFL आणि इतर संबंधित कंपन्यांच्या सुमारे डझनभर जागेवर छापे टाकले होते.
सीबीआयने (CBI) आतापर्यंतचा सर्वात मोठा बँक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या संघासह 34,615 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीप्रकरणी डीएचएफएल (DHFL) चे कपिल वाधवन आणि धीरज वाधवन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजन्सीच्या स्कॅनरखाली आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बँक फसवणूक आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआय मुंबईतील आरोपींच्या 12 ठिकाणांचा शोध घेत आहे. तपास एजन्सीने दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. चे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवन, संचालक धीरज वाधवन आणि रिअॅल्टी क्षेत्रातील सहा कंपन्यांवर, युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या कन्सोर्टियमची 34,615 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी, एबीजी शिपयार्ड्सवर 23,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते.
11 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने ही कारवाई केली आहे. यापूर्वी 2021 मध्ये, युनियन बँक ऑफ इंडियाने सीबीआयला डीएचएफएलचे प्रवर्तक आणि नंतर व्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी पत्र लिहिले होते. यामध्ये, युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या कन्सोर्टियमला 40,623.36 कोटी रुपयांचा (30 जुलै 2020 पर्यंत) तोटा झाल्याचे सांगण्यात आले. (हेही वाचा: बनावट क्रिप्टो एक्सचेंज फ्रॉडमध्ये भारतीय गुंतवणूकदारांची तब्बल 1000 कोटींची फसवणूक; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)
27 जानेवारी 2020 रोजी, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा सीएमडी कपिल वाधवन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यापूर्वी 2019 मध्ये, ईडीने ऑक्टोबरमध्ये DHFL आणि इतर संबंधित कंपन्यांच्या सुमारे डझनभर जागेवर छापे टाकले होते. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार मुंबई आणि आसपासच्या भागात हे छापे टाकण्यात आले. दरम्यान, डीएचएफएल ही गृहनिर्माण वित्त कंपनी आहे. कपिल वाधवन त्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. डीएचएफएल आता बुडण्याच्या मार्गावर असून त्याची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे.