Bhopal: भोपाळजवळील जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये सापडले 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपये रोकड; आयकर विभागाने टाकला होता छापा
दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने भोपाळ आणि इंदूरमधील एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणांवर छापे टाकले होते. आता पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारमधून सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) आयकर विभागाच्या छाप्यात 52 किलो सोने (Gold) आणि 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. भोपाळजवळील मेंदोरीच्या जंगलात उभ्या असलेल्या एका कारमधून हे सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागासह 100 पोलिसांच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त केला. ज्या कारमधून सोने आणि पैसे जप्त करण्यात आले त्या जंगलात उभ्या असलेल्या कारच्या नंबर प्लेटवर आरटीओ टॅग होता.
मध्य प्रदेशात दोन दिवसांपासून लोकायुक्त आणि प्राप्तिकराचे धाडसत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने भोपाळ आणि इंदूरमधील एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणांवर छापे टाकले होते. आता पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारमधून सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कार ग्वाल्हेरची असून 2020 मध्ये खरेदी करण्यात आली होती.
लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी मध्य प्रदेश परिवहन विभागाच्या एका माजी कॉन्स्टेबलच्या घरातून 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली, ज्यात रोख 2.85 कोटी रुपये आहेत. पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, येथील पॉश अरेरा कॉलनीतील माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा याच्या दोन मालमत्तांवर सकाळी छापे टाकण्यात आले. या छाप्यात रोख रकमेशिवाय सोने आणि 50 लाख रुपये किमतीची चांदीही जप्त करण्यात आली आहे. डीएसपींनी सांगितले होते की, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे देखील सापडली आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे. मात्र, सौरभ शर्माचा शोध लागू शकला नाही. (हेही वाचा: Satta Matka Result: सट्टा मटका खेळामध्ये कशी होते फसवणूक? या गोष्टींकडे ठेवा लक्ष)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा याने सुमारे एक वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. यानंतर जंगलात एका कारमध्ये एवढी मोठी रक्कम सापडली असून गाडीवर आरटीओ प्लेट होती. हे सोने आणि रोख कोणाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या कारची नोंदणी चेतन नावाच्या व्यक्तीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सौरभ शर्माला अटक झाल्यास मोठे खुलासे होऊ शकतात.