Bharat Bandh Against Farm Bill 2020: शेती विधेयक विरुद्ध 'भारत बंद', महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थानसह देशभर शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही या तीन विधेयकांना(Agriculture Bills) देशभरातून तीव्र विरोध होत आहे.

Bharat Bandh Against Farm Bill 2020 | Photo Credits-ANI)

केंद्राच्या शेती विधेयककांना देशभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी आज या विधेयकाविरुद्ध 'भारत बंद' (Bharat Bandh) पुकारला होता. या बंदला देशभरातील विविध राज्यांतून मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र (Maharashtra), पंजाब (Punjab), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थानसह (Rajasthan), बिहार हरियाणासह देशभरातील अनेक राज्यांनी या बंदला पाठिंबा दिला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही या तीन विधेयकांना(Agriculture Bills) देशभरातून तीव्र विरोध होत आहे. लोकसभेत बहुमताच्या जोरावर ही विधेयकं मंजूर केल्यानंतर राज्यसभेतही हे विधेयकं आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. या वेळी सभागृहात विरोधकांनी या विधेयकाचा तीव्र विरोध केला. त्यानंतर आता देशभरातही या विधेयकाला विरोध होत आहे.

महाराष्ट्र: कोल्हापूर, पालघर, मुंबई नंदुरबार, जालना येथे तीव्र विरोध

केंद्राच्या शेती विधेयक विरोधात महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे. या विधेयकाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या 'भारत बंद' ला महाराष्ट्रात शेतकरी संघटना आणि सत्ताधारी पक्षांनी पाठिंबा दर्शवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय किसान सभा (आयकेएस), स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतरही घटक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. आयकेएस अध्यक्ष अशोक नवले यांच्या नेतृत्वाखाली पालघर, मुंबई येथे महेंद्र उगडे, ठाण्यात सुनील खरपत, बीडमध्ये सुभाष ढाके, जालना- गविंद अरदाद, नंदुरबार येथे सुदाम ठाकरे, नांदेडमध्ये अर्जुन अडे, कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी अशा विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आंदोलन झाले. (हेही वाचा, Bharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन)

पंजाब, हरियाणा: चक्का जाम

पंजाब आणि हरियाणा राज्यात शेतकऱ्यांनी कृषी विधेयकास विरोध करण्यासाठी चक्का जाम आंदोलन केले. या शेतकऱ्यांनी राज्यव्यापीप चक्का जाम आंदोलन केल्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी आणि सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळविण्यात हे आंदोलन बऱ्यापैकी यशस्वी झाले. विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, संस्था आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. आक्रमक शेतकऱ्यांनी रेल्वे मार्गावरच चक्का जाम केल्याने प्रदीर्घ काळ रेल्वे ठप्प होती. दरम्यान, पंजाबमधील पटियाला, लुधियाना, भठिंडा, मोगा, होशियारपुर, जालंधर आणि इतर ठिकाणी आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळाली. (हेही वाचा, Farm Bills 2020: मोदी सरकारची पळवाट? की विरोधकांचा आक्रस्ताळेपणा? राज्यसभेतील गोंधळ टाळता आला असता काय?)

बिहार: तेजस्वी यादव ट्रॅक्टरवर, बिहारमध्ये शेती विधेयकास तीव्र विरोध

केंद्र सरकारच्या शेती विधेयकास बिहारमध्ये शुक्रवारी तीव्र विरोध पाहायला मिळाला. शेतकरी संघटनांनी आयोजित केलेल्या भारत बंदला यूनियन डेमोक्रेटिक अलायन्स (यूडीए) चे घटक पक्ष भारतीय सबलोग पार्टी आणि जनता दल राष्ट्रवादी ने जे.पी.गोलंबर येथे आंदोलन केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी झाली. काही आंदलक आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते तेजस्वी यादव आणि जन अधिकार पार्टी (जाप) चे नेते पप्पू यादव यांनी ट्रॅक्टर चालवत या आंदोलनात सहभाग नोंदवला. (हेही वाचा, Parliament Session 2020: प्रचंड गदारोळात 2 कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर; कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, 'शेतकरी हितासाठी MSP व्यवस्था राहणार कायम')

मध्य प्रदेश: कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित विरोध

मध्य प्रदेशमध्येही कृषी बिलास शेतकऱ्यांचा विरोध व्यक्त होताना दिसला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली. काही ठिकाणी कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींग न पाळल्याने पोलिसांना कायद्याचा वापर करावा लागला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये मर्यादित प्रमाणात भारत बंदला प्रतिसाद मिळताना दिसला.

उत्तर प्रदेश: पश्चिमेकडील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

उत्तर प्रदेशमध्येही शेतकऱ्यांनी कृषी बिलास विरोध केला. खास करुन पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये या बिलाला तीव्र विरोध दिसला. अनेक शेतकऱ्यांनी रस्ते आडवले. दरम्यान, या आंदोलनात काँग्रेस, समाजवादी पक्षही सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये समाजवादी पक्ष धरने आंदोलन करत आहेत. तर उत्तर प्रदेश काँग्रेस येत्या 28 सप्टेंबरला विधानभवनाला घेराव घालणार आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके राज्यसभेत मंजूर झाली खरी. परंतू, या वेळी राज्यसभेत गदारोळ पाहायला मिळाला. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली.दरम्यान, विरोधी पक्ष, शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेलेही काही पक्ष या विधेयकाच्या विरोधात आहेत. तरीही आवाजी मतदानाद्वारे हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या वेळी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. राज्यसभा सभापतींना कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. नंतर सभागृहात गोंधळ घालणाऱ्या 8 सदस्यांना सभापतींनी निलंबीत केले.