Ban on Same-Sex Marriage, Iive-in Relation: समलिंगी विवाह, लिव्ह-इन रिलेशनशिपवर घालण्यात यावी बंदी; खाप पंचायतीच्या नेत्यांची मागणी, आंदोलनाचा इशारा
खाप पंचायतींनी यापूर्वीही प्रेमविवाहांना विरोध केला आहे. आता त्यांनी अशा विवाहास पालकांची संमती आवश्यक असून त्याच गोत्रात लग्नाला बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
Ban on Same-Sex Marriage, Iive-in Relation: हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा प्रेमविवाह, लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह अशा मुद्द्यांवर वाद होताना दिसत आहेत. हरियाणातील जींद येथे रविवारी खाप महापंचायत (Khap Panchayat) झाली. खाप महापंचायतीने पालकांची संमती नसलेले प्रेम विवाह, समलैंगिक विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशिपवर बंदी घालण्याची मागणी केली. याबाबत रघुबीर नैन म्हणाले की, महापंचायतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. खाप पंचायत प्रेमविवाहाच्या विरोधात नाही, मात्र प्रेम विवाहासाठी कुटुंबीयांची संमती आवश्यक आहे. कुटुंबाच्या संमतीशिवाय मुलांचे लग्न होऊ शकत नाही.
नैन पुढे म्हणाले, पालकांच्या इच्छेचा मुलांनी आदर केला पाहिजे. त्याच गोत्रात होणारे विवाह बंद करण्याची मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, ‘समलिंगी विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशिपवर बंदी घातली पाहिजे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलांना संपत्तीचे अधिकार कसे मिळणार? समलिंगी विवाह प्राण्यांमध्येही होत नाही. माणसे जनावरांपेक्षा वाईट झाली आहेत का?’. सामाजिक जडणघडण बिघडवणाऱ्या मुद्द्यांवर सरकारकडे कायद्यात दुरुस्तीची मागणी केली जाईल, असा निर्णय खाप महापंचायतीने घेतला.
हे मुद्दे उपस्थित करण्यासाठी खाप पंचायत विरोधी पक्षनेत्याचीही भेट घेणार असल्याचे रघुबीर नैन यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या मागण्या आणि हिंदू कोड बिलात सुधारणा न केल्यास आम्ही आंदोलन करू. खाप पंचायतींच्या बैठकीत या तीन मुद्द्यांवर एकमत झाले. हरियाणातील खाप नेते या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. हरियाणातील जिंद येथील बैठकीनंतर खाप नेत्यांनी हे संकेत दिले.
हरियाणातील खाप पंचायतींची बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा राज्यात पावसाळा संपताच विधानसभा निवडणुका होणार आहेत. खाप पंचायतींनी यापूर्वीही प्रेमविवाहांना विरोध केला आहे. आता त्यांनी अशा विवाहास पालकांची संमती आवश्यक असून त्याच गोत्रात लग्नाला बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये खाप पंचायतींचा मोठा प्रभाव आहे. आताच्या महापंचायतीसाठी 300 खापांना निमंत्रित करण्यात आले होते. महापंचायतीत हरियाणा, गुजरात, यूपी, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानच्या खापांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. (हेही वाचा: Fraud Case: लग्नाच्या वेळी पत्नीने वय लपवले, सोनोग्राफीनंतर सत्य समोर आले; पतीने दाखल केला फसवणुकीचा गुन्हा)
दरम्यान, खाप किंवा सर्वखाप ही सामाजिक रूढी-परंपरा यांच्याशी निगडीत सामाजिक प्रशासनाची एक प्रणाली आहे, जी भारतातील राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश यांसारख्या उत्तर-पश्चिम भागात प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मात्र त्यांना अधिकृत मान्यता नाही. खाप पंचायतींवर प्रभावशाली लोकांचे किंवा गोत्राचे वर्चस्व असते. तसेच महिलांचा त्यात समावेश नाही, त्यांना प्रतिनिधित्वही नाही. ही फक्त पुरुषांचीच पंचायत आहे.