Ayodhya's Ram Temple Donations: अयोध्या राम मंदिरात 11 दिवसात तब्बल 11 कोटी रुपयांचे दान, प्राणप्रतिष्ठेनंतर 25 लाख भाविकांनी घेतले दर्शन
23 जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले. 22 जानेवारी रोजी केवळ व्हीआयपी भाविकांनीच प्रभू रामलल्लाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर 1 फेब्रुवारीपर्यंतचे दर्शन आणि देणगीची आकडेवारी समोर आली आहे.
Ayodhya's Ram Temple Donations: राम मंदिरात (Ram Temple) रामलल्लाच्या अभिषेकनंतर तीर्थक्षेत्र अयोध्येत (Ayodhya) भाविकांचा महापूर आला आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यानंतर, आतापर्यंत सुमारे 25 लाख राम भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. राम मंदिराला 22 जानेवारीनंतर पहिल्या 11 दिवसांत 11 कोटींहून अधिक रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. मंदिराच्या दानपेटीत सुमारे आठ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून देण्यात आली आहे, तर साडेतीन कोटी रुपयांच्या देणग्या ऑनलाइन प्राप्त झाल्या आहेत.
प्रभू रामलल्लाचा 22 जानेवारीला अभिषेक झाला. 23 जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले. 22 जानेवारी रोजी केवळ व्हीआयपी भाविकांनीच प्रभू रामलल्लाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर 1 फेब्रुवारीपर्यंतचे दर्शन आणि देणगीची आकडेवारी समोर आली आहे. ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, भगवान रामलल्ला जेथे विराजमान आहेत त्या गर्भगृहासमोरील दर्शन मार्गाजवळ चार मोठ्या आकाराच्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये भाविक दान देत आहेत. याशिवाय 10 संगणकीकृत काउंटरवरही लोक देणगी देत आहेत. (हेही वाचा: BAPS Hindu Mandir in Abu Dhabi New Pictures: बीएपीएस हिंदू मंदिराच्या प्रगतीचे साक्षीदार होण्यासाठी अबुधाबीमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यवर एकत्र आले)
साधारण 14 कर्मचाऱ्यांची टीम चार दानपेट्यांमध्ये देणग्यांची गणना करते. यामध्ये 11 बँक कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रकाश गुप्ता म्हणाले की, देणगी गोळा करण्यापासून ते मोजण्यापर्यंत सर्व काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली केले जाते. माहितीनुसार, रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी दररोज सुमारे 2 लाख भाविक येत आहेत. कडाक्याची थंडी असूनही रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालेली नाही. दररोज सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते आणि दुपारी अडीच तासांच्या विश्रांतीनंतर रात्री 10 वाजेपर्यंत भाविक दर्शन घेतात.