Ayodhya Mosque: पवित्र मक्केतून आली अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीची पहिली वीट; सोन्याच्या अक्षरात लिहिली आहेत 'आयतें, Watch Video
त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतील रौनाही येथील धन्नीपूर गावात मशिदीसाठी 5 एकर जमीन दिली होती.
Ayodhya Mosque First Brick: अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिराच्या अभिषेकनंतर आता इथल्या मशिदीची (Ayodhya Mosque) तयारी वेगाने सुरू आहे. या मशिदीचे बांधकाम एप्रिल 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्याला मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद असे नाव देण्यात आले आहे. इस्लामच्या तत्त्वांवर आधारीत पाच मिनार असलेली ही मशीद आता आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या या मशिदीसाठी मक्केतून खास काळ्या मातीच्या विटा पाठवण्यात आल्या आहेत. या खास 'पवित्र' विटेवर सोन्याच्या अक्षरात 'आयत' लिहिलेले आहेत. अयोध्येमधील मशिदीच्या पायाभरणीसाठी ही वीट वापरली जाणार आहे.
अयोध्येतील धन्नीपूर येथील बाबरी मशिदीच्या जागी देण्यात आलेल्या पाच एकर जागेवर ही मशीद बांधली जाणार आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF), उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड (UPSCWB) ने स्थापन केलेला ट्रस्ट त्याच्या देखभालीची विशेष जबाबदारी घेत आहे. या मशिदीच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणारी ही पहिली वीट मक्का आणि मदिना येथे अभिषेक केल्यानंतर मुंबईत आणण्यात आली आहे.
मुंबईच्या भट्टीत भाजलेली ही वीट पाच भाविकांनी मुंबईहून पवित्र मक्का येथे नेली होती. तेथे विटेला झमझमच्या पाण्याने 'घुस्ल' (पूर्ण स्नान) देण्यात आले. त्यानंतर ही वीट मदिना शरीफला नेण्यात आली. ही खास वीट 2 फेब्रुवारीला महाराष्ट्रात परत आणण्यात आली. त्यानंतर ती अजमेर शरीफ येथे नेण्यात येईल. यानंतर ही पवित्र वीट अयोध्येला नेण्यात येईल. मशीद विकास समितीचे प्रमुख आणि इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सदस्य अराफत शेख यांनी सांगितले की, एप्रिलपर्यंत वीट अयोध्येपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने संपूर्ण प्रवासाचे नियोजन केले जाईल. (हेही वाचा: Govind Dev Giri Maharaj यांचं मोठं विधान; 'ज्ञानव्यापी, कृष्णजन्मभूमी मुक्त करा आम्ही सारं विसरून जायला तयार!')
दरम्यान, रामजन्मभूमी वादावर आपला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला मशिदी बांधण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उत्तर प्रदेश सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतील रौनाही येथील धन्नीपूर गावात मशिदीसाठी 5 एकर जमीन दिली होती. अयोध्येपासून सुमारे 25 किमी अंतरावर बांधण्यात येणारी मशीद भारतातील सर्वात मोठी मशीद असेल. 21 फूट उंच आणि 36 फूट रुंद असे जगातील सर्वात मोठे कुराण त्यात ठेवण्यात येणार आहे.