Aurangabad Renamed Sambhaji Nagar: आता गूगल कडूनही औरंगाबादच्या 'संभाजीनगर' या नामांतराला हिरवा कंदील!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादच्या नामांतराचा हा निर्णय यापूर्वीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. पण ती बैठक बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्याने तो निर्णय अवैध असल्याचं सांगत पुन्हा औरंगाबाद (Aurangabad) नामांतराच्या निर्णयावर शिंदे सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला. या नामांतराविषयी वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया बघायला मिळाल्या.
पण आता शिंदे सरकारच्या या नामांतराच्या निर्णयाला थेट गूगलनेही (Google) हिरवा कंदील दिला आहे. आता गूगल मॅपवर (Google Map) औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. गुगुल मॅपवर औरंगाबाद शोधल्यास मराठीत (Marathi) औरंगाबाद तर इंग्रजीत (English) 'संभाजीनगर' (Sambhaji Nagar) असा उल्लेख दाखवत आहे. गेल्या आठवड्याभरापासून नामांतराच्या मुद्यावरून राज्यात वाद पेटला आहे त्यात आता गूगलच्या 'संभाजीनगर' या उल्लेखाने वाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (हे ही वाचा:-Aurangabad Renamed Sambhaji Nagar: औरंगाबादच्या नामांतर निर्णयानंतर खा. इम्तियाज जलील यांचा शिंदे सरकारवर घणाघात)
यापूर्वीही औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती. शिवसेना (Shiv Sena) असो किंवा भाजप (BJP) स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला जात आहे. औरंगाबादचे नामांतर हे त्याचाचं एक उदाहरण आहे. औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय घ्यायचे होते, म्हणून नामांतराचा मुद्दा पुढे केला जात आहे,असे खडे बोल खा. इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या मुद्यावरुन राज्य सरकारला सुनावले होते. तरी गूगलच्या या नव्या अपडेटचा राज्यातील राजकारणावर काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.