'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर माहीममध्ये हल्ला; पार्किंगच्या वादातून बॅटने मारहाण

प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यकते आणि 'मराठी बाणा'चे निर्माते अशोक हांडे यांच्यावर १ मार्च रोजी त्यांच्या माहीम येथील कार्यालयात एका व्यक्तीने पार्किंगच्या वादातून हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबईतील माहीम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी कलाकार आणि 'चौरंग' संस्थेचे संस्थापक अशोक हांडे यांच्यावर पार्किंगच्या किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. १ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना त्यांच्या माटुंगा पश्चिम येथील कार्यालयात घडली. आरोपीने थेट कार्यालयात शिरून हांडे यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली. या घटनेत त्यांच्या कानाला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

नेमकी घटना काय?

अशोक हांडे यांचे 'चौरंग-मराठी बाणा' हे कार्यालय माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोडवर आहे. घटनेच्या दिवशी आरोपी प्रथमेश उर्फ बंटी उनफोडे (वय ५३) हा हातात क्रिकेटची बॅट घेऊन कार्यालयात शिरला. त्याने तिथे असलेल्या रिसेप्शनिस्टला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून अशोक हांडे आपल्या केबिनमधून बाहेर आले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावरच हल्ला चढवला.पार्किंगवरून 'हप्ता' वसुलीचा प्रयत्नमिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व वाद गाड्यांच्या पार्किंगवरून झाला.

'मराठी बाणा'च्या कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या कार्यालयाबाहेर पार्क केल्या जात होत्या. आरोपीने या गाड्या तिथे पार्क करण्यासाठी 'हप्ता' देण्याची मागणी केली होती. "येथे गाड्या लावायच्या असतील तर पैसे द्यावे लागतील," अशी धमकी त्याने यापूर्वी चालकांनाही दिली होती. अशोक हांडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने संतापून हे कृत्य केले.आरोपीला अटक आणि पोलीस कारवाईघटनेनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रथमेश उनफोडेला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अटकेच्या वेळी पोलिसांशीही उद्धट वर्तन केले आणि त्यांना शिवीगाळ केली. आरोपीवर खंडणी, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अशोक हांडे हे मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील अत्यंत आदराचे नाव आहे. १९८७ मध्ये त्यांनी 'चौरंग' या संस्थेची स्थापना केली. मराठी लोककला, संगीत आणि संस्कृतीचा वारसा जपणारा 'मराठी बाणा' हा त्यांचा कार्यक्रम जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी आतापर्यंत ६००० हून अधिक प्रयोग केले असून १५ पेक्षा जास्त राज्यांत आणि परदेशातही मराठी संस्कृतीचा डंका वाजवला आहे. 'मंगल गाणी दंगल गाणी', 'आवाज की दुनिया' आणि 'माणिकमोती' यांसारख्या दर्जेदार कार्यक्रमांचे संकल्पक म्हणून त्यांची ओळख आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement