दिलासादायक! कोरोना व्हायरससाठी आरोग्य मंत्रालयाकडून Anti-HIV औषधांची शिफारस; जयपूरच्या इटालियन जोडप्याला देण्यात आला डोस

देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 100 च्यावर गेली आहे

Coronavirus: Medical workers (Photo Credits: IANS)

जगभरात हजारो लोकांचा प्राण घेणारा आणि लाखो लोकांना संक्रमित करणारा कोरोना व्हायरस (Corona Virus) सध्या भारतातही आपला हाहाकार माजवत आहे. देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 100 च्यावर गेली आहे, तर फक्त महाराष्ट्रात 41 रुग्ण करोना विषाणूने बाधित आहेत. सध्या अमेरिकेत याबाबतच्या लसीची चाचणी सुरु आहे. या सर्वात एक दिलासादायक बाब समोर येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोनावर मात करण्यासाठी अँटी एचआयव्ही औषधे (Anti-HIV Drug), 'लोपीनावीर’ (Lopinavir) आणि ‘रीटोनाविर'’ (Ritonavir) या औषधांची शिफारस केली आहे.

सध्या कोरोना विषाणूने ग्रस्त झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी ही औषधे वापरण्यात येईल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. ही औषधे रुग्णांच्या स्थितीच्या तीव्रतेनुसार, केस-दर-केस वापरली जातील. कोरोना विषाणूच्या ‘क्लिनिकल मॅनेजमेन्ट' विषयी सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य मंत्रालयाने ही शिफारस केली आहे. मंत्रालयाने मंगळवारी मधुमेह, मूत्रपिंड रुग्ण, फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील, उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी लोपीनावीर आणि रीटोनावीर औषधांची शिफारस केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्स, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि डब्ल्यूएचओ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीने उपचाराच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेतला. त्यानंतर कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त रूग्णांच्या सहयोगी उपचारांची शिफारस केली. (हेही वाचा: कर्नाटक मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 76 वर्षीय रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही COVID-19 ची लागण)

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात वृद्ध इटालियन जोडप्याला, ही दोन्ही औषधे प्रथमच देण्यात आली. ही दोन्ही औषधे मोठ्या प्रमाणात एचआयव्ही नियंत्रणासाठी वापरली जातात. दरम्यान सध्या तरी कोरोना व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही. यावर संशयित रूग्णांची लवकर लवकर ओळख व वेळेवर केलेला प्रतिबंधच याच्या नियंत्रणास मदत करते. मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, रूग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांच्या तब्येतीत काही समस्या आढळल्यास त्यांनी त्वरीत रुग्णालयात परत यावे.