Amarnath Yatra 2021: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अमरनाथ यात्रा 2021 साठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित 

केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधील वाढत्या कोरोनाच्या घटना लक्षात घेता, श्री अमरनाथ जी श्राईन बोर्डाने (Amaranthji Yatra Shrine Board) अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) नोंदणी प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे.

Amarnath's Shiva Lingam (Photo Credits: ANI)

देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाने गती पकडली आहे. मागील वेळेपेक्षा आताचा कोरोना संसर्ग सुमारे तीन पट अधिक वेगाने वाढत आहे. यामुळे, देशातील बहुतेक राज्यांमधील परिस्थिती बरीच भयावह बनली आहे. आता केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधील वाढत्या कोरोनाच्या घटना लक्षात घेता, श्री अमरनाथ जी श्राईन बोर्डाने (Amaranthji Yatra Shrine Board) अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) नोंदणी प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. बोर्ड सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे आणि परिस्थिती सुधारल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होईल.

जम्मू-काश्मीरमध्ये बाबा अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार आहे. त्या दृष्टीने गेल्या एप्रिलपासून जम्मू काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक आणि येस बँकेच्या 446 शाखांमध्ये यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे, तर गेल्या 15 एप्रिलपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली. यावेळी यात्रा 28 जूनपासून सुरू होईल आणि 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. बाबा अमानाथ यात्रेला भेट देणाऱ्या भाविकांचे वय किमान 13 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे निश्चित केले गेले आहे.

यावेळी श्री अमरनाथजी श्राईन मंडळाने सहा लाख भाविकांची व्यवस्था केली आहे. यात्रेसाठी आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी आणि प्रवासाच्या भिन्न मार्गासाठी परमिट वेगवेगळे असेल. हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या यात्रेकरूंना आगाऊ नोंदणीची आवश्यकता भासणार नाही, कारण त्यांचे तिकीट यासाठी पुरेसे असेल. मात्र आत देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नोंदणी प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. (हेही वाचा: नित्यानंद यांनी वाढत्या COVID19 च्या रुग्णसंख्येमुळे भारतातून कैलाशा येथे येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी)

दरम्यान, भारतात मागील 24 तासांमध्ये 3 लाख 14 हजार 835 कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. त्यामुळे सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,59,24,989 वर पोहचली आहे. काल 24 तासांत 2104 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.