सावरकर जयंती निमित्त हिंदू महासभेच्या पूजा पांडेय यांच्याकडून विद्यार्थ्यांना चाकूचे वाटप

गांधी पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी झाडणाऱ्या पूजा पांडेय यांनी सावरकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना चाकूचे वाटप केले आहे.

Pooja Pandey (Photo Credit- Facebook)

हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडेय (Pooja Pandey) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे गांधी पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी झाडणाऱ्या पूजा पांडेय यांनी सावरकर जयंती निमित्त चक्क चाकू वाटप केले आहे. सावरकर जयंती निमित्त त्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी शाळेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या मुलांना आमंत्रित केले होते.

हाती आलेल्या वृत्तानुसार, सावरकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात परीक्षेत टॉप करणाऱ्या मुलांना त्यांनी बक्षीस म्हणून चाकू दिले. याबद्दल बोलताना पूजा पांडेय यांनी सांगितले की, "आत्मरक्षणासाठी मुलांना चाकू, तलवार देण्यात आले आहेत. यातून आपली रक्षा आपण स्वतः करावी, हा संदेश मिळतो." यात अधिकतर 6-10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळी झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या सचिव पूजा पांडेय पतीसह अटकेत)

धर्माला धोका असल्याने याची अत्यंत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तसंच त्यांना राष्ट्रवाद विषयावर एक पुस्तक देण्यात आले. भगव्या रंगाच्या या पुस्तकावर पूजा पांडेय आणि वीर सावरकरांचा फोटो आहे.

30 जानेवारी 2019 रोजी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारुन गांधी जयंती साजरी करण्याचा प्रकार चांगलाच गाजला होता. त्यानंतर अलिगड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.