Air India च्या कर्मचार्‍याला कोरोना विषाणूची लागण; दिल्ली येथील मुख्यालय केले सील

एयर इंडियाचे कर्मचारी कोरोना विषाणूचा बळी पडत असलेले दिसून येत आहे

Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

परदेशातून भारतीयांना मायदेशी आणण्यात गुंतलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) लाही कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका बसला आहे. एयर इंडियाचे कर्मचारी कोरोना विषाणूचा बळी पडत असलेले दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या कर्मचार्‍यामध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे, त्यानंतर आता नवी दिल्ली (Delhi) मधील अशोक रोड येथील एअर इंडियाचे मुख्यालय (Headquarter) सील करण्यात आले आहे. आता हे मुख्यालय स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे व हे मुख्यालय दोन दिवस बंद असणार आहे.

एअर इंडियाच्या कमर्शियल विभागात कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर, कंपनीच्या मुख्यालयाच्या स्वच्छतेची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत. एअर इंडिया मुख्यालय पूर्णपणे सीलबंद केले आहे. असे सांगितले जात आहे की, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला कर्मचारी सरव्यवस्थापकांच्या कार्यालयाशी निगडीत आहे. या कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या एअर इंडियाच्या इतर सर्व लोकांचा शोध घेतला गेला आहे. एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचा-याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना शोधून त्यांना वेगळे ठेवण्यासाठी पाठवले जात आहे.

उल्लेखनीय म्हणजे, एअर इंडिया कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय म्हणजेच वंदे भारत अभियान या दिवसात पार पाडत आहे. त्याअंतर्गत लॉक डाऊनमध्ये विदेशात अडकलेल्या भारतातील नागरिकांना घरी आणले जात आहे. गेल्या काही दिवसांत जगातील विविध देशांतून मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांना घरी आणले गेले. दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये लोकांना विमानाने आणले जात आहे. या अभियानात कमर्शियल विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे यामुळेच आजकाल या विभागातील बहुतेक कर्मचारी कार्यालयात येत होते. (हेही वाचा: भारतासाठी पुढील 30 दिवस महत्वाचे, कोरोना व्हायरसची दीड ते साडेपाच लाख प्रकरणे समोर येण्याची शक्यता)

याआधी एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. काही दिवसांपूर्वी मालवाहू विमानाने ते चीनला गेले होते, त्यानंतर मुंबईतील उड्डाण-तपासणीपूर्वी हे पाच पायलट कोरोना पॉझिटिव्ह आढळले.