New Year Party मध्ये परवानगी न घेता हवे ते गाणे लावल्यास होऊ शकते कारवाई; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

कोर्टाने आपल्या नव्या आदेशात म्हटले आहे की, देशभरातील रेस्टॉरंट्स, पब, हॉटेल, कॅफे, बार आणि रिसॉर्ट्सने पीपीएल (फोनोग्राफिक परफॉरमन्स लिमिटेड) ची परवानगी घेतली नसली, तर ते पार्ट्यांमध्ये कॉपीराइट असलेली गाणी वाजवू शकणार नाहीत

New Year's Party (Photo credits: Needpix)

सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपणही नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीची (New Year Party) तयारी सुरु केली असेल. आपले आवडते रेस्टॉरंट किंवा बार निवडले असतील. सोबतच कोणत्या गाण्यावर थिरकणार याची यादीही बनवली असेल. मात्र नवीन वर्षाचे स्वागत असावे आणि त्यासाठी पोलिस किंवा कोर्टाकडून कोणताही आदेश नसावा, असे कसे होईल? तर यावेळी आदेश आला आहे तो मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court).

कोर्टाने आपल्या नव्या आदेशात म्हटले आहे की, देशभरातील रेस्टॉरंट्स, पब, हॉटेल, कॅफे, बार आणि रिसॉर्ट्सने पीपीएल (फोनोग्राफिक परफॉरमन्स लिमिटेड) ची परवानगी घेतली नसली, तर ते पार्ट्यांमध्ये कॉपीराइट असलेली गाणी वाजवू शकणार नाहीत. गाण्याचे पैसे न भरता जर गाणे वाजवले, तर कारवाई केली जाऊ शकते.

मुंबई आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात पीपीएलने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हे आदेश दिले आहेत. पीपीएलशी संबंधित गाणी वाजवल्याबद्दल कोर्टाने चंदीगडमधील 7 मोठ्या क्लब आणि रेस्टॉरंट्सविरूद्ध स्थगितीचे आदेशही जारी केले आहेत. सोबतच पोलिसांनाही आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. मागील वर्षी पीपीएलच्या याचिकेवर, चंदीगड जिल्हा न्यायालयाने शहरातील 23 रेस्टॉरंट्स आणि क्लबवर स्थगिती आदेश जारी केले होते. देशातील संगीत उद्योगातील लोकांनी तयार केलेल्या संस्थेद्वारे, त्यांचे संगीत अथवा गाणी सार्वजनिकरित्या वाजवायची असल्यास फी आकारली जाते. यापूर्वी पीपीएलच्या तक्रारीवरून गेल्या वर्षी डॉमिनोज पिझ्झा विरोधात पोलिस स्टेशन 36 मध्ये कॉपी राईट अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. (हेही वाचा: नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्टी करणाऱ्यांना बसणार मोठा फटका; मुंबई महानगरपालिकेने रेस्टॉरन्ट आणि पबसंदर्भात जारी केले नवे आदेश)

भारतात टी-सीरीज, सोनी म्युझिक किंवा यूनिवर्सल म्युझिकच संगीत बनवतात. पीपीएल इंडिया हे सरेगामा, सुपर कॅसेट (टी सीरीज), सोनी म्युझिक, युनिव्हर्सल म्युझिक आणि इतर अनेकांचे प्रतिनिधित्व करते. या सर्वांनी असाइनमेंट आणि कॉपीराइट कायदा 1957 अंतर्गत, कायद्याच्या संबंधित कलमांनुसार सार्वजनिकरित्या संगीत वाजवल्यास फी गोळा करण्याचे अधिकार पीपीएल इंडियाला दिल आहेत. त्यामुळे पैसे न भरता तुम्ही गाणी वाजवली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.