आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की; देशातील Covid-19 परिस्थितीसाठी फक्त मोदी सरकारच जबाबदार असल्याचे The Lancet चे मत
याचा परिणाम म्हणून, भारत एका मोठ्या संकटाला तोंड देत आहे
काळ बनून आलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या दुसर्या लाटेने संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजवला आहे. देशात परिस्थिती इतकी बिकट कशी झाली हे समजून घेण्याचा शास्त्रज्ञ आणि संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशात ‘द लॅन्सेट’ (The Lancet) या प्रतिष्ठित जर्नलमधील संपादकीयमध्ये कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला (PM Narendra Modi Government) जबाबदार धरले आहे. तसेच भारतामध्ये येत्या काळात उपाय म्हणून कोणती पावले उचलण्याची गरज आहे हेही नमूद केले आहे. अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर कोरोना संकट अयोग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल टीका होत आहे.
प्रमुख आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल लॅन्सेटने एका संपादकीयात मोदी सरकारला फटकारले आहे की, ‘साथीच्या आजाराशी लढा देण्याऐवजी भारत सरकार ट्विटरवरील टीका बंद करण्यात अधिक व्यस्त असल्याचे दिसत आहे. सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांनी, स्वत: आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासह अनेकांनी कोरोनावर विजय प्राप्त केल्याचे घोषित केले होते. अशा प्रकारच्या निवेदनांवरून कोरोनाबाबत भारत सरकार किती निष्काळजी होते हे सूचित होते.’ संपादकीयात असेही लिहिले आहे की, सरकारला कोरोनाच्या प्रसाराबद्दल चेतावणी देण्यात आली होती, परंतु सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही.
संपादकीय पुढे म्हणते, 'भारतामध्ये अंमलात आणलेल्या मॉडेलने चुकीच्या पद्धतीने दर्शवले की, देश हर्ड इम्यूनिटीच्या जवळ पोहोचत आहे. यामुळे लोक निर्धास्त झाले व त्यांची दुसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी अपुरी पडली. परंतु जानेवारीत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सीरो सर्वेमध्ये असे आढळले की, केवळ 21 टक्के लोकांमध्येच SARS-CoV-2 विरुद्ध अँटीबॉडीज होत्या.’ संपादकीयात पुढे म्हटले आहे की, 'भारताला कोरोनाचा नवीन स्ट्रेन आणि दुसर्या लाटेबाबत वारंवार चेतावणी दिली जात होती. मात्र सरकारने याआधी असे अनेक संकेत दिले की भारतामध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.’
इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एंड इव्हॅल्युएशनने एका संपादकीयचा हवाला देऊन असा अंदाज केला आहे की, यावर्षी 1 ऑगस्टपर्यंत भारतातील कोरोना साथीने 10 लाख लोक मृत्यूमुखी पडतील. तसे झाल्यास या राष्ट्रीय आपत्तीला मोदी सरकार जबाबदार असेल. कारण कोरोनाच्या सुपर स्प्रेडरच्या नुकसानीबाबत इशारे देऊनही सरकारने धार्मिक कार्यक्रमांना तसेच अनेक राज्यांत निवडणुका घेण्यास परवानगी दिली.
लॅन्सेटने देशातील लसीकरण मोहिमेवरही टीका केली आहे. ते म्हणतात, ‘सरकारने कोविड-19 संपल्याचा संदेश प्रसारित केल्यामुळे भारतातील लसीकरण अभियानही मंदावले. आतापर्यंत देशातील दोन टक्क्यांपेक्षा कमी लोकांचेच लसीकरण झाले आहे. राज्यांसह धोरणात बदल न करता केंद्राने अचानक 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याची घोषणा केली, ज्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.’ (हेही वाचा: गुजरात मध्ये गोशाळेत कोरोना सेंटर सुरु, रुग्णांना दिली जातायत दूध आणि गोमुत्रापासून तयार केलेली औषधे)
लॅन्सेट शेवटी म्हटले आहे की, या सर्व गोष्टींमुळे सरकार पूर्णपणे निष्काळजी व बेफिकीर होते, त्यामुळे दुसर्या लाटेसाठी पुरेशी तयारी केली गेली नाही. याचा परिणाम म्हणून, भारत एका मोठ्या संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे मोदी सरकारने या गोष्टींची जबाबदारी घेऊन नव्या उपयोजना अंमलात आणाव्यात.