Coronavirus: कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाची दिल्ली येथे आत्महत्या; सफदरजंग रुग्णालयाच्या इमारतीतून मारली उडी
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 150 च्या वर गेली आहे. परिणामी आता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत
देशावरील कोरोना विषाणूचे (Corona Virus) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 150 च्या वर गेली आहे. परिणामी आता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत. सरकार त्यांच्या परीने जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जनता अजूनही या विषाणूबाबत अनभिज्ञ असताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी राजधानी दिल्लीच्या, सफदरजंग रुग्णालयाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारुन एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. हा रुग्ण कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण होता. तनवीर सिंह (Tanveer Singh) असे त्याचे नाव असून, तो 35 वर्षांचा होता.
बुधवारी सिडनीहून एअर इंडियाच्या विमानाने हा तरुण भारतात परत आला होता. विमानतळावर झालेल्या तपासणीमध्ये त्याच्यामध्ये कोरोना विषाणू बाबतीत संशयास्पद लक्षणे आढळली. त्यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात पाठविण्यात आले. डोकेदुखीच्या तक्रारीनंतर या संशयित रुग्णाला आयपीआय विमानतळावरून रात्री 9 वाजता थेट सफदरजंग रुग्णालयात आणले गेले आणि एकांतात ठेवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार तो मूळचा पंजाबचा असून गेल्या एक वर्षापासून सिडनी येथे राहत होता. (हेही वाचा: लुधियाना येथे Coronavirus चे 167 संशयित रुग्ण बेपत्ता; पोलीस व आरोग्य विभागाकडून शोध सुरु)
रुग्णालयाचे पीआरओ दिनेश नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरून पडल्यामुळेच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र तो कोरोनो विषाणूचा रुग्ण होता की नाही याची अद्याप पुष्टी करण्यात आली नाही. दरम्यान, भारतात बुधवारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता राजधानी दिल्लीतील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलने सध्या इलेक्टिव्ह शस्त्रक्रियेवर बंदी घातली आहे.