लवकरच चलनी नोटांवर दिसू शकतो Rabindranath Tagore आणि APJ Abdul Kalam यांचा फोटो; RBI करत आहे विचार
बंगालमध्ये त्यांना विशेष दर्जा आहे. बंगालमधील घरांमध्ये रवींद्रनाथ टागोरांचे चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याच वेळी, भारताचे 11 वे राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ एपीजे अब्दुल कलाम हे देशाच्या महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पहिल्यांदाच नोटेवरील फोटो बदलण्याचा विचार करत आहे. महात्मा गांधींसोबत रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांचे फोटो भारतीय चलनावर छापण्याचा विचार होत आहे. आतापर्यंत नोटांवर फक्त महात्मा गांधींचाच फोटो दिसत होता, मात्र आरबीआयने या निर्णयाला मंजुरी दिल्यास महात्मा गांधींसोबत रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचाही फोटो नोटांवर दिसू शकतो.
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अर्थ मंत्रालय आणि आरबीआय लवकरच याबाबत काही ठोस पावले उचलू शकतात. अहवालानुसार, वित्त मंत्रालय आणि आरबीआय अंतर्गत सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने गांधी, टागोर आणि कलाम यांच्या वॉटरमार्क केलेल्या छायाचित्रांचे दोन वेगवेगळे नमुने, आयआयटी दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शहानी यांना पाठवण्यात आले आहेत. प्राध्यापक शहानी यांना दोनपैकी एक संच निवडून सरकारसमोर मांडण्यास सांगितले आहे. त्याचा अंतिम निर्णय उच्चस्तरीय बैठकीत होणार असल्याचे बोलले जात आहे.
चलनी नोटांवर अनेक अंकी वॉटरमार्क समाविष्ट करण्याची शक्यता तपासण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. यूएस डॉलरमध्ये विविध नोटांवर जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस जेफरसन, अँड्र्यू जॅक्सन, अलेक्झांडर हॅमिल्टन आणि अब्राहम लिंकन यांच्यासह 19व्या शतकातील काही राष्ट्राध्यक्षांची छायाचित्रे आहेत. (हेही वाचा: केंद्राने राज्यांना दिल्या एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्याच्या सूचना)
दरम्यान, रवींद्रनाथ टागोरांचे नाव देशात आणि जगात लोक आदराने घेतले जाते. बंगालमध्ये त्यांना विशेष दर्जा आहे. बंगालमधील घरांमध्ये रवींद्रनाथ टागोरांचे चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याच वेळी, भारताचे 11 वे राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ एपीजे अब्दुल कलाम हे देशाच्या महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. महात्मा गांधींसोबतच या दोघांचे फोटो आता भारतीय चलनी नोटांमध्ये दिसू शकतात. आरबीआय पहिल्यांदाच नोटांवर महात्मा गांधींव्यतिरिक्त इतर व्यक्तिमत्वांचे फोटो वापरण्याचा विचार करत आहे.