72nd Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद; जाणून घ्या कुठे पाहाल त्यांचे भाषण
या दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज सोमवारी, 25 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) देशाला संबोधित करतील
उद्या भारतामध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन (72nd Republic Day) साजरा करण्यात येईल. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारताला 'प्रजासत्ताक राष्ट्र' म्हणून घोषित केले व याचदिवसापासून भारताची राज्यघटना लागू झाली होती. तर या दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज सोमवारी, 25 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) देशाला संबोधित करतील. सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर आणि अखिल भारतीय रेडिओवर हे भाषण हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये प्रसारित केले जाईल. हे भाषण दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रसारित केले जाईल.
त्याच बरोबर, राष्ट्रपतींचे भाषण रात्री 9.30 वाजता प्रादेशिक भाषांमध्ये ऑल इंडिया रेडिओच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित केले जाईल. यावेळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे प्रजासत्ताक दिन उत्सव थोड्या वेगळ्या पद्धतीने आयोजित केला जात आहे. 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती इंडिया गेटवर राष्ट्रध्वज फडकावतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय राजधानीतील सुरक्षा अजूनच कडक करण्यात आली आहे. शहरात हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, शहरातील व्यस्त बाजारपेठ व भागात गस्त वाढविण्यात आली आहे.
शेतकरी संघटनांचा प्रस्तावित ट्रॅक्टर मार्च पाहता सीमावर्ती भागातील सुरक्षाही कडक करण्यात आली आहे. राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी खुर्च्यासुद्धा सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून लावल्या जातील. यावेळी परेड पाहणार्या लोकांची संख्या कमी करत ही संख्या 25 हजारांवर मर्यादित केली गेली आहे, मागील वेळी जवळपास 1.25 लाख लोकांची व्यवस्था इथे होती. (हेही वाचा: Republic Day 2021 Rangoli Designs: प्रजासत्ताक दिनानिमित्त काढा 'या' सोप्या आकर्षक आणि Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स)
दरम्यान, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनी देशवासियांचे अभिनंदन केले आहे. कोरोना साथ असूनही बिहार आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले. 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमात आभासी पद्धतीने भाषण केले. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपतींनी सर्वोत्तम निवडणूक पद्धतींसाठी विशेष पुरस्कार सादर केले. त्यांनी निवडणूक आयोग वेब रेडिओ 'हॅलो वोटर्स' देखील सुरू केले.