70 Hours Work Week: 'मग म्हणतात हृदयविकाराचा झटका का येतो'; Narayana Murthy यांच्या 70 तास काम करण्याच्या सूचनेवर Cardiologist ची प्रतिक्रिया
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, दर आठवड्याला 55 तासांपेक्षा जास्त काम केल्याने स्ट्रोकचा धोका 35 टक्के आणि हृदयविकाराचा धोका 17 टक्क्यांनी वाढतो.
इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांच्या 70 तास कामाच्या विधानावर देशभरात खळबळ उडाली आहे. नारायण मूर्ती हे भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने नेमलेल्या कोणत्याही समितीचे सदस्य नसले तरी, भारतातील कामाच्या तासांबाबतच्या त्यांच्या वक्तव्याची देशभरात आणि इंटरनेटवर जोरदार चर्चा होत आहे. भारतातील तरुणांनी दर आठवड्याला सुमारे 70 तास काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. या विधानावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
अनेक उद्योगपतींनी मूर्तींच्या कार्य सप्ताहाच्या विधानाचे समर्थन केले आहे, तर अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचे वक्तव्य अमानवीय असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी, बेंगळुरू-स्थित हृदयरोगतज्ज्ञ डॉ दीपक कृष्णमूर्ती यांनी देखील या समस्येवर लक्ष केंद्रित केले आणि अवास्तव कामाच्या तासांसह कामाच्या वेळापत्रकाचे दीर्घकालीन आरोग्यावरील परिणाम उघड केले. डॉक्टरांनी म्हटले आहे की, इतक्या जास्त प्रमाणत काम केल्याने हृदयविकाराचा झटका, तणाव, चिंता, पाठदुखी आणि इतर आजारांचा धोका वाढू शकतो. (हेही वाचा: Deaths Due to Heart Disease: मुंबईत 2022 मध्ये दर चौथा मृत्यू हा हृदयविकारामुळे; BMC ने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी)
हृदयरोगतज्ज्ञ डॉ दीपक कृष्णमूर्ती म्हणतात, ‘दिवसात 24 तास असतात. जर तुम्ही आठवड्यातून 6 दिवस दररोज 12 तास काम करत असाल तर उर्वरित 12 तासांपैकी 8 तास झोपण्यासाठी गेले. राहिलेल्या 4 तासांपैकी बेंगळुरूसारख्या शहरात 2 तास रस्त्यावर जातात. राहिलेल्या 2 तासांत तुम्ही घरातील काही कामे करता. अशात सोशल व्हायला वेळ नाही, घरच्यांशी बोलायला वेळ नाही, व्यायामाला वेळ नाही, मनोरंजनासाठी वेळ नाही. कामाच्या तासांनंतरही ईमेल आणि कॉल्सना उत्तर देण्याची कंपन्यांची अपेक्षा असते. मग आश्चर्यचकित होतो की, तरुणांना हार्टअटॅक का येत आहेत?’
दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, दर आठवड्याला 55 तासांपेक्षा जास्त काम केल्याने स्ट्रोकचा धोका 35 टक्के आणि हृदयविकाराचा धोका 17 टक्क्यांनी वाढतो. डब्ल्यूएचओ आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने 2021 मध्ये एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित केलेल्या एका पेपरमध्ये असे दिसून आले आहे की, जास्त तास काम केल्यामुळे स्ट्रोक आणि इस्केमिक हृदयरोगामुळे 2016 मध्ये 7,45,000 मृत्यू झाले, जे वर्ष 2000 च्या तुलनेत 29 टक्के अधिक आहे.