लसीचा पुरवठा करणाऱ्या Bharat Biotech च्या 50 कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण; देशाची वाढली चिंता
या ट्विटला उत्तर देताना एका युजरने लिहिले आहे की, 'तुमच्या 50 कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लागण झालीच कशी? त्यांना लस दिली नव्हती? तसेच, तात्पुरते अधिकाधिक लोक भरती का केले जात नाहीत?’
देशात सध्या कोरोना विषाणू लसीकरण (Covid-19 Vaccination) मोहिमेला वेग आला आहे. प्रत्येक नागरिकास कोरोना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशात भारत बायोटेकबाबतच्या (Bharat Biotech) एका वृत्तामुळे देशाची चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकच्या 50 कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एल्ला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, अलीकडेच त्यांचे 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. सुचित्रा एल्ला यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
भारत बायोटेकमध्ये कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीनंतर, लोकांचे म्हणणे आहे की कंपनीने अद्याप आपल्या कर्मचार्यांना कोरोनाची लस का दिली नाही. कोविड-19 विरोधी लस कोव्हॅक्सिन पुरविण्याबाबत उशीर होत असल्याची टीका काही नेत्यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना एल्ला यांनी बुधवारी ट्विट केले. ज्यामध्ये त्या म्हणतात, ‘काही राज्ये आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करीत आहे, हे ऐकून वाईट वाटले. कोरोना संसर्ग झाल्यामुळे आमचे 50 कर्मचारी सध्या कामावर नाहीत. मात्र तरी साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आम्ही दिवसरात्र प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून अधिकाधिक लोकांना कोरोना लस दिली जाऊ शकेल.’
या ट्विटला उत्तर देताना एका युजरने लिहिले आहे की, 'तुमच्या 50 कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लागण झालीच कशी? त्यांना लस दिली नव्हती? तसेच, तात्पुरते अधिकाधिक लोक भरती का केले जात नाहीत?’ (हेही वाचा: Bharat Biotech च्या Covaxin ला 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी)
दरम्यान, एल्ला यांनी सांगितले आहे की 18 राज्यांना लहान खेपांमध्ये कोव्हॅक्सिनचा पुरवठा झाला आहे. हैदराबाद-स्थित कंपनी आंध्र प्रदेश, हरियाणा, ओडिशा, आसाम, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, बिहार, झारखंड आणि दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल अशा 18 राज्यांना लस पुरवत आहे.