धक्कादायक! मध्य प्रदेशमध्ये मोबाईलच्या प्रकाशात केली 37 महिलांची नसबंदी शस्त्रक्रिया; ऑपरेशननंतर जमिनीवर झोपवले (Video)
आता छतरपूरमध्येही (Chhatarpur) अशीच घटना घडली आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शासकीय रुग्णालयांकडून रुग्णांचे दुर्लक्ष होत असल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. नुकतेच विदिशाच्या (Vidisha) ग्यारसपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात, नसबंदीनंतर (Sterilization surgery) स्त्रियांना थंड जमिनीवर झोपवले गेल्याची घटना घडली होती. आता छतरपूरमध्येही (Chhatarpur) अशीच घटना घडली आहे. छतरपूरच्या जिल्हा रूग्णालयात नसबंदी ऑपरेशननंतर महिलांना बेडवर नाही तर, थंड जमिनीवर झोपवण्यात आले होते. इतकेच नाही तर उपचारानंतर त्यांना स्ट्रेचरसुद्धा मिळाले नाही. महिलांच्या कुटुंबीयांनी हाताने महिलांना बाहेर काढले.
एएनआय व्हिडीओ -
शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवल्यामुळे स्त्रियांना संसर्ग होण्याचा धोका असतो, मात्र डॉक्टरांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या महिलांना तसेच जमिनीवर झोपवले. नसबंदीसाठी आलेल्या महिलांना रुग्णवाहिकाही पुरवण्यात आल्या नाहीत. याबाबत मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ.के.एस. अहिरवार यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि जबाबदारांवर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
दुसरीकडे, बिरसिंहपूरच्या (Birsinghpur) प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी मोबाईल फ्लॅशलाइटच्या प्रकाशात महिलांवर नसबंदी ऑपरेशन केल्याची घटना समोर आली आहे. सीएमएचओ डॉ. एके अवधिया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सीएमएचओ म्हणाले की, ऑपरेशनदरम्यान सतत वीजपुरवठ्यासाठ जनरेटरची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र ऐनवेळी जनरेटर उपलब्ध झाला नसल्यामुळे ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एलटीटीच्या ऑपरेशन दरम्यान, लेप्रोस्कोपच्या मदतीने रिंग जोडली जाते. रिंग लावल्यानंतर, लेप्रोस्कोप काढून टाकले जाते आणि टाके घातले जातात. अशा प्प्रकाराची शस्त्रक्रिया मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने करणे हे महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. शनिवारी बिरसिंहपूरमध्ये 37 महिला शिबिरात आल्या होत्या. सायंकाळी चार वाजता ऑपरेशन सुरू झाले, यावेळ महिलांसाठी बेडसुद्धा दिले नव्हते. त्यांना जमिनीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.