Coronavirus: दिल्लीमध्ये उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात 13 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण
देशातील काही राज्यात तर दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. आता दिल्लीत उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयालाही या विषाणूने वळसा घातला आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर जगात तसेच भारतातही दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातील काही राज्यात तर रोजच कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. आता दिल्लीत (Delhi) उपराज्यपाल अनिल बैजल (Lieutenant Governor Anil Baijal) यांच्या कार्यालयालाही या विषाणूने वळसा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात 13 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. मंगळवारी सकाळी ही माहिती समोर आली आहे. देशात अनलॉक 1.0 ची अंमलबजावणी सुरु झाली आहे, परंतु कोरोना विषाणूचे प्रमाण भारतात तसेच दिल्लीत वाढतच आहे. दिल्लीत कोरोनाची प्रकरणे 20 हजारांच्या पुढे गेली आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने उप राज्यपालांच्या कार्यालयाचा हवाला देत सांगितले की, इथे 13 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या त्याच्या जवळील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे तसेच इतर कर्मचार्यांचीही चौकशी सुरू आहे. यापूर्वी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या कार्यालय व जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयांतूनही कोविड-19 संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
यासोबतच दिल्लीतील मोतीनगर पोलिस ठाण्यात तैनात 20 पोलिसांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पोलिस स्टेशनमध्ये संक्रमणाची पहिली घटना दहा दिवसांपूर्वी समोर आली होती. (हेही वाचा: अभिनेत्री मोहिना कुमारीसह, पती, सासू-सासरे अशा घरातील 7 जणांना कोरोना विषाणूची लागण)
कोरोना विषाणूचा सामना करण्याची तयारी पूर्ण झाल्याचा दावा दिल्ली सरकारने केला आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आज सांगितले की, दिल्ली सरकार किमान एक महिना आधीपासून तयारी करत आहे. पूर्वी असे म्हटले जात होते की कोरोना मे मध्ये संपेल, पण आता मे संपला आहे मात्र कोविड-19 संपलेला नाही. दरम्यान, 1 जून रोजी दिल्लीमध्ये कोविडमुळे 990 लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आता दिल्लीत संक्रमणाची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या एकूण 20,834 लोक संसर्गित आहेत आणि आता मृतांचा आकडा 523 वर पोहोचला आहे.