100 कोटींच खर्च, 45 कुटुंबांचे स्थलांतर तरीही डोनाल्ड ट्रंप नाखूष; ऐनवेळी रद्द केली डील, कॉंग्रेसने साधला पीएम नरेंद्र मोदींवर निशाणा
24 व 25 फेब्रुवारी रोजी ते भारत दौर्यावर येणार आहेत. 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प गुजरातच्या अहमदाबादला भेट देतील.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या स्वागतासाठी भारतात जय्यत तयारी सुरू आहे. 24 व 25 फेब्रुवारी रोजी ते भारत दौर्यावर येणार आहेत. 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प गुजरातच्या अहमदाबादला भेट देतील. ट्रम्प यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी गुजरात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. ट्रंप यांच्या दौऱ्यासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रंप यांनी भारतासोबत होणारी ट्रेड डील (Trade Deal) रद्द केली आहे. यावरून कॉंग्रेसने (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लक्ष्य केले आहे.
कॉंग्रेसने आपल्या ट्विटरवर याबाबत लिहिले आहे, 'इतका खर्च करूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्वरित भारताबरोबर व्यापार करार करण्यास नकार दिला आहे.'
बुधवारी कॉंग्रेसने ट्विट करत म्हटले, 'असे दिसते आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या स्वागताबाबत खुश नाहीत. ते इतके नाखूष आहेत की, त्यांनी भारताशी व्यापार करार रोखला आहे. ट्रम्प यांच्या गुड बुक्समध्ये जाण्यासाठी मोदींना त्यांच्या पीआरवर अजून लक्ष केंद्रित करावे लागेल असे दिसते.' बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये भारत दौर्याबाबत निवेदन दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मित्र आहेत. भारताशी व्यापार कराराबाबत ते म्हणाले की, ते आत्ताच व्यापार करार करणार नाहीत, परंतु हा करार निवडणुकीच्या आसपास करता येण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा: डोनाल्ड ट्रंप यांचा भारत दौरा; तीन तासांसाठी 100 कोटी खर्च करणार सरकार, जाणून घ्या खर्चाचे नियोजन)
सोबतच अमेरिकेचे अध्यक्ष, भारतात पोहोचल्यावर विमानतळावर 70 लाख लोक त्यांचे स्वागत करतील. ज्यासाठी ते खूप उत्साही आहेत. कॉंग्रेसने आपल्या ट्विटवर जो फोटो शेअर केला आहे, त्यात असा दावा केला आहे की, ट्रंप यांच्या या भेटीसाठी 100 कोटी रुपये खर्च केला आहे, तसेच भारतातील गरिबी दिसू नये म्हणून, 45 कुटुंबांचे स्थलांतरही केले आहे.