आसाराम बापूचा मुलगा, नारायण साई बलात्कार प्रकरणात दोषी; 30 एप्रिल रोजी होणार शिक्षेची सुनावणी
आज, शुक्रवारी सूरत येथील सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवले
नारायण साई (Narayan Sai), स्वघोषित बाबा आणि आसाराम बापू (Asaram Bapu) यांच्या मुलाला, न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. आज, शुक्रवारी सूरत येथील सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवले असून, शिक्षेची सुनावणी ही 30 एप्रिल रोजी होणार आहे. 11 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत 2 बहिणींनी तक्रार दाखल केली होती. यातील एका मुलीवर आसाराम बापूंनी तर तिच्या बहिणीवर नारायण साईने बलात्कार केला होता.
बलात्काराचा आरोप झाल्यानंतर नारायण साई फरार होता, त्याला डिसेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली. त्याचवेळी त्याने बलात्कार केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर तपासात त्याने इतर अनुयायांच्यासोबतही असे कृत्य केल्याचे आढळून आले. आतापर्यंत नारायण साईच्या विरोधात 53 साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली आहे. आता जहांगीरपुरा आश्रमातील बलात्कार प्रकरणामध्ये न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले आहे. (हेही वाचा: पोटच्या पोरीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापाला दिल्ली हायकोर्टाने सुनावली आजीवन कारावासाची शिक्षा)
अटक झाल्यानंतर 2013 पासून तो तुरुंगात होता. बलात्काराखेरीज हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याने पोलिसांना 13 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोपही झाला होता. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे. दरम्यान आसाराम बापू जोधपुरच्या न्यायालयात शिक्षा भोगत आहेत. बलात्काराच्याच आरोपाखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 5 ऑगस्ट 2013 साली एका अल्पवयीन मुलीवर त्यांनी बलात्कार केला होता, त्याबद्दल एप्रिल 2018 साली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.