Arvind Kejriwal's First Reaction After Arrest: 'माझे जीवन देशासाठी समर्पित आहे'; अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

'माझे जीवन देशासाठी समर्पित आहे,' असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Arvind Kejriwal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Arvind Kejriwal's First Reaction After Arrest: अटक झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझे जीवन देशासाठी समर्पित आहे,' असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. गुरुवारीच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केजरीवाल यांची सुमारे दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातून अटक केली होती. आज केजरीवाल यांच्यावर पीएमएलए प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. यासंदर्भात ईडीने केजरीवाल यांच्याबाबत अनेक दावे केले आहेत. ईडीने दोन लोकांच्या चॅटचा हवाला देत त्यात रोख रकमेबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. ईडीने सांगितले की, हवालाच्या माध्यमातून 45 कोटी रुपये गोव्यात ट्रान्सफर करण्यात आले. वेगवेगळ्या लोकांना मोठ्या रकमा दिल्या. आम्ही या लोकांचे सीडीआर तपशील मिळवले आहेत. त्यांचे फोन रेकॉर्डही आमच्याकडे आहेत. विजय नायर यांच्या एका कंपनीकडूनही पुरावे मिळाले आहेत. हे पैसे चार मार्गांनी गोव्यात पाठवण्यात आले.

सीएम केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, एखाद्याला दोषी ठरवण्याचे कारण आणि ईडीकडे उपलब्ध असलेली सामग्री यांचा संबंध असावा. अटकेची गरज का पडली हा प्रश्न आहे. त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत ईडीकडे सर्व काही आहे, मग अटकेची काय गरज होती, असा प्रश्न केला आहे. (हेही वाचा -Arvind Kejriwal Arrest: अरविंद केजरीवाल राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर, सुनावणी सुरू; ईडीने मागितली 10 दिवसांची कोठडी)

याआधी केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठासमोरही सुनावणी होणार होती. मात्र केजरीवाल यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. दिल्लीचे नवीन मद्य धोरण नोव्हेंबर 2021 मध्ये लागू करण्यात आले होते. मात्र हे धोरण सुरुवातीपासूनच वादात राहिले. नंतर, दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना एक अहवाल सादर केला, ज्यामध्ये मद्य धोरणात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अटक होणारे केजरीवाल हे चौथे मोठे नेते आहेत. (वाचा - Arvind Kejriwal Was Spying On ED Officials: ईडी अधिकाऱ्यांची हेरगिरी करत होते अरविंद केजरीवाल; घरात सापडले पुरावे)

याआधी मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षीच 4 ऑक्टोबरला ईडीने आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केली होती. त्यानंतर या महिन्यात 15 मार्च रोजी ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कवितालाही अटक केली होती.