कॉंग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरून प्रिया दत्त यांना हटवले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून प्रिया दत्त यांच्या नावाची घोषणा झाली असली तरी, कॉंग्रेसकडून फार मोठा झटका प्रिया दत्त यांना देण्यात आला आहे. प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरून हटवण्यात आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली.
नुकतीच उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये, निरुपम यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून दत्त यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र 2014 पासून दत्त या मतदारसंघात फिरकल्या सुद्धा नाहीत. असं असताना त्यांच्या नावाची घोषणा कशी करता? असा प्रश्न विचारात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत गोंधळ घातला होता. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे अशोक गेहलोत यांनी प्रिया दत्त यांना 26 सप्टेंबर रोजीच पत्र पाठवून त्यांना सचिवपदावरून हटवण्यात येत असल्याचं कळवलं आहे. मात्र सचिव म्हणून दत्त यांनी केलेल्या कार्याचीही या पत्रात प्रशंसा करण्यात आली आहे. शिवाय भविष्यात त्यांची पक्षाला गरज भासणार असल्याचंही म्हटलं आहे.
प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून खासदार होत्या. 2014 लोकसभा निवडणूकीत भाजपाचे प्रमोद महाजन यांच्या कन्या भाजप खासदार पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. दरम्यान, प्रिया दत्त यांचा गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष कार्यालयात सक्रीय सहभाग नव्हता, त्यामुळे दत्त यांना पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दत्त यांना सेक्रेटरी पदावर काम केल्याबद्दलल आभार मानत त्यांना पदमुक्त केलं आहे.
याबाबत आपले मत व्यक्त करताना, ‘मला पदावरून काढलं यात निराश होण्याचं काही कारण नाही. ही तर एक प्रक्रिया आहे. मी एआयसीसीची सेक्रेटरी म्हणून दीर्घकाळ काम केलं आहे. त्यामुळे आता नवीन तरूणांना संघटनेत संधी मिळाली पाहिजे. एकच व्यक्ती कायम पदावर राहिली तर इतरांना संधी कशी मिळणार?’ असे प्रिया दत्त म्हणाल्या.