नरेंद्र मोदी यांच्यामुळेच BSNL आणि MTNL बंद होण्याच्या मार्गावर: कॉंग्रेसचा आरोप

कॉंग्रेसने आरोप केला आहे की, मोदी यांच्या मित्रांना फायदा पोहचावा म्हणून बीएसएनएल आणि एमटीएनएल आज बंद होण्याच्या मार्गावर आहे

BSNL (Photo Credit: Livemint)

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडच्या (BSNL) च्या तब्बल 54 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाण्याची बातमी आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावरून गुरुवारी कॉंग्रेसने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. कॉंग्रेसने आरोप केला आहे की, मोदी यांच्या मित्रांना फायदा पोहचावा म्हणून बीएसएनएल आणि एमटीएनएल आज बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले आहे.

ट्वीटमध्ये रणदीप सुरजेवाला म्हणतात, ‘बीएसएनएल आणि एमटीएनएल कोणाची टेलिफोन कंपनी आहे? तर देशातील 130 कोटी जनतेची. मात्र आज या दोन्ही कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे आणि या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याला जबाबदार कोण? तर नरेंद्र मोदी यांच्या मित्रांच्या कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून आज या सरकारी कंपन्यांची ही हालत आहे’.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात बीएसएनएल कडून एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने संचालक मंडळाला दहा सुधारणा सुचवल्या होत्या. यापैकी तीन सुधारणांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. (हेही वाचा: BSNL कर्मचारी भरती, मासिक पगार 16400 ते 40500 रुपये; पात्रता, अर्जाची शेवटची तारीख घ्या जाणून)

ज्या तीन सुधारणांवर शिक्कामोर्तब झाले आहेत त्यामध्ये, बीएसएनएलच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 58 वर्षांपर्यंत कमी करण्यात आले आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी 50 ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बीएसएनएलकडून 4 जी स्पेक्ट्रमची वाटप वाढवण्यात येणार आहे.