#MeToo : छे...छे.. तो बलात्कार नव्हे, ते तर परस्परसंमतीचे संबंध - एम. जे. अकबर यांचा दावा

जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा महिला पत्रकाराने केला आहे

एम जे अकबर (Photo Credits: PTI)

महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनेचे महत्व आता चांगलेच वाढले आहे. समाजाच्या तळागाळातील लोक आपल्या सत्तेचा आणि अधिकाराचा वापर करून महिलांवर जबरदस्ती करतात, आणि याची कुठे वाच्च्यतादेखील होत नाही. आपल्या कृत्यानंतर परत ही व्यक्ती उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळी. आतापर्यंत असलेले हे चित्र एका #MeToo चळवळीमुळे पूर्णतः बदललेले दिसते. याचेच एक महत्वाचे उदाहरण म्हणजे भाजपचे नेते एम. जे. अकबर.

एम. जे. अकबर यांच्यावर तब्बल डझनहून अधिक महिलांनी लैगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. प्रत्येकवेळी या नेत्याने हे आरोप धुडकावले, मात्र विरोधकांच्या दबावामुळे शेवटी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावाच लागला. हे प्रकरण ताजे असताना आता एका महिला पत्रकारानेही थेट अमेरिकेहून एम. जे. अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महिला पत्रकाराने तिच्यावर ओढवलेला गंभीर प्रसंग मांडला आहे. एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा या महिला पत्रकाराने केला आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना एम जे अकबर यांनी आपल्यातील शरीरसंबंध परस्पर संमतीनेच झाले होते अशी कबुली दिली आहे. (हेही वाचा : 'एम. जे. अकबर यांनी माझ्यावरही बलात्कार केला होता'; महिला पत्रकाराचा सणसणाटी आरोप)

‘नोकरीवरून काढून टाकेन’, असे सांगून अकबर यांनी वेळोवेळी आपल्यावर जबरदस्ती केली, लैंगिक अत्याचार केले. नोकरीवर गदा येऊ नये म्हणून आपणही हे सर्व सहन करीत राहिलो असे या महिला पत्रकाराचे म्हणणे आहे.

मात्र एम जे अकबर यांनी एका मुलाखतीदरम्यान, ‘1994च्या काळी आमच्यात संबंध होते, परस्परसंमतीने आम्ही एकत्र होतो. मात्र नंतर हे नाते संपले’ असे सांगितले आहे.

दरम्यान, एम जे अकबर यांच्यावर प्रिया रमणी यांनी पहिल्यांदा आरोप लावले होते. नोकरीच्या मुलाखतीवेळी अकबर यांनी केलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप प्रिया रमणी यांनी केले होते. या आरोपांमुळेएम. जे. अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर प्रिया रमणी व अन्य महिलांविरोधात एम. जे. अकबर यांनी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला असतानाच आता या महिला पत्रकारानेदेखील बलात्काराचा आरोप केल्याने अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.