Rules Change From 1st May 2023: एप्रिल महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यानंतर मे महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही ना काही नियम बदलतात. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करतात. त्यामुळे हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊयात या बदलांबद्दल...(हेही वाचा - Bank Holiday in May 2023: मे महिन्यात 12 दिवस बंद राहणार बँक, पाहा, सुट्टीची संपूर्ण यादी)
जीएसटी नियमांमध्ये बदल -
मे महिन्याच्या सुरुवातीपासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठा बदल होणार आहे. नवीन नियमानुसार, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना 7 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) व्यवहाराची पावती अपलोड करणे बंधनकारक आहे. सध्या इनव्हॉइस तयार करण्याच्या आणि अपलोड करण्याच्या तारखेसाठी अशी कोणतीही मर्यादा नाही.
म्युच्युअल फंडात केवायसी अनिवार्य -
म्युच्युअल फंड कंपन्यांना बाजार नियामक सेबीने हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की, गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. याची अंमलबजावणी 1 मेपासून होणार आहे. यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात.
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती -
सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी, सीएनसी-पीएनजीच्या नवीन किमती जाहीर करते. गेल्या महिन्यात सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती. यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2,028 रुपयांवर आला. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल होऊ शकतो.
प्रमोशनल आणि स्पॅम कॉल्सपासून मिळणार सुटका -
कॉल्स आणि एसएमएसमध्ये एआय फिल्टर्स सुरू केल्यामुळे वापरकर्त्यांना टेलिमार्केटिंगच्या नावाखाली येणारे संदेश आणि कॉलपासून मुक्ती मिळेल. देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने देखील आपल्या सिस्टममध्ये वापरकर्त्यांसाठी एआय फिल्टर स्थापित करण्यास सुरुवात केली आहे. जिओ लवकरच युजर्ससाठी हे फिल्टर इन्स्टॉल करेल अशी अपेक्षा आहे.