Manish Sisodia CBI Custody: मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ; 10 मार्च रोजी होणार जामीन अर्जावर सुनावणी
न्यायालयाने त्याच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. त्याच्या जामीन अर्जावर 10 मार्च रोजी पुन्हा विचार केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले आहे.
Manish Sisodia CBI Custody: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना आजही जामीन मिळू शकला नाही. न्यायालयाने त्याच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. त्याच्या जामीन अर्जावर 10 मार्च रोजी पुन्हा विचार केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्याचवेळी आज मनीष सिसोदिया यांनी स्वत: न्यायाधीशांकडे सीबीआयची तक्रार केली. चौकशीच्या नावाखाली सीबीआय आपला छळ करत असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले. त्याचवेळी सीबीआयने सिसोदिया यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. सिसोदिया अजूनही तपासात सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, सीबीआयने माझ्या घरावर छापे टाकले, ऑफिसवर छापे टाकले, माझ्या वडिलोपार्जित घरावर छापे टाकले. असे असूनही काहीही सापडले नाही. दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना आधी उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच सीबीआयने न्यायालयाकडे आणखी तीन दिवसांची कोठडी मागितली आहे. (हेही वाचा - Manish Sisodia Bail Application: मनीष सिसोदिया यांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केली जामीन याचिका)
दरम्यान, आतापर्यंत किती तास चौकशी झाली? अशी विचारणा न्यायालयाने यावेळी केली. याला उत्तर देताना सीबीआयने म्हटले की, सिसोदिया अजूनही सहकार्य करत नाहीत. सीबीआयने सांगितले की, मनीष सिसोदिया हे आतापर्यंत काही अधिकाऱ्यांशी समोरासमोर आले आहेत. मनीष सिसोदिया यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे तिथेच वेळ घालवला गेला. तपासासाठी आवश्यक असलेली काही कागदपत्रे गहाळ असल्याचे तपास यंत्रणेने यावेळी सांगितले.