Madhya Pradesh: पन्ना जिल्ह्यात खाणीत मजुरांना सापडला 8.22 कॅरेटचा हिरा; 40 लाख किंमत, 15 वर्षांपासून चालू होता शोध
जिल्हाधिकारी सांगतात की हा हिरा 21 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या लिलावात ठेवला जाईल. पन्नामध्ये एखाद्याला हिरा मिळण्याची ही पहिली वेळ नाही
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पन्ना (Panna) जिल्ह्यात एका मजूर आणि त्याच्या तीन साथीदारांना एका खाणीत 8.22 कॅरेटचा हिरा (Diamond) सापडला आहे. स्थानिक तज्ञांनी सांगितले की हिऱ्याची किंमत 40 लाख रुपयांपर्यंत असू शकते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशा कच्च्या हिऱ्यांच्या लिलावानंतर मिळालेल्या पैशातून रॉयल्टी आणि कर कापल्यानंतर उर्वरित रक्कम संबंधित मजुरांना दिली जाते. रतनलाल प्रजापती आणि त्याच्या साथीदारांना सोमवारी हा हिरा सापडला. या चौघांनी पन्ना नगरजवळील हिरापूर तापेरियन येथील हिरा कार्यालयाकडून भाडेपट्टीवर हिऱ्याची खाण स्थापन केली होती.
खाणीत कठोर परिश्रम केल्यानंतर आज त्यांचे नशीब उघडले आहे. रतनलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हिऱ्याच्या कार्यालयात हा हिरा जमा केला आहे. या सापडलेल्या हिऱ्याची अंदाजे किंमत 40 लाखांच्या जवळपास आहे. रतनलालने सांगितले की, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. आता तो हिऱ्यांच्या लिलावानंतर मिळालेला पैसा त्याच्या सर्व भागीदारांमध्ये समान प्रमाणात वितरित करेल.
शासकीय कार्यालयात हा मौल्यवान दगड जमा केल्यानंतर या चौघांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी गेल्या 15 वर्षांपासून विविध खाणींमध्ये हिऱ्यांचा शोध घेतला होता, परंतु सोमवारी पहिल्यांदा नशीब चमकले. जिल्हाधिकारी सांगतात की हा हिरा 21 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या लिलावात ठेवला जाईल. पन्नामध्ये एखाद्याला हिरा मिळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकांना येथे मौल्यवान हिरे सापडले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही एका मजुराला खाणीतून 7.5 कॅरेटचे तीन हिरे सापडले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, असा अंदाज आहे की भोपाळपासून 380 किमी अंतरावर असलेल्या पन्ना जिल्ह्यात जमिनीत 12 लाख कॅरेटच्या हिऱ्यांचे भांडार आहे. अलीकडे सापडलेले मौल्यवान हिरे आणि मजुरांच्या इतर 139 हिऱ्यांचा लिलाव 21 सप्टेंबरपासून सुरू होईल. (हेही वाचा: Swiss Bank On Black Money: स्वीस बँक भारताला देणार 'काळा पैसा' खातेधारकांची माहिती)
या लिलावातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, एक 14.09 कॅरेटचा प्रचंड हिरा असेल, जो योग्य बोली न लागल्याने गेल्या लिलावात विकला जाऊ शकला नाही. हा 14.09 कॅरेटचा हिरा या वर्षी फेब्रुवारीमध्ये पन्ना जिल्ह्यातील कृष्णा कल्याणपूर गावाजवळ एका पट्टेदार खाणीत एका मजुराने सापडला होता आणि मार्च महिन्यात झालेल्या शेवटच्या लिलावात तो विकला जाऊ शकला नव्हता.