Coronavirus: इंदोर येथे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर स्थानिक नागरिकांकडून दगडफेक; पाहा व्हिडिओ

देशावर कोरोनाचे संकट असतानाही नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी डॉक्टर, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, रात्रीता दिवस करत आहेत. परंतु, एका वृद्ध महिलेची मेडिकल चेकअप करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. देशावर कोरोनाचे संकट असतानाही नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी डॉक्टर, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, रात्रीता दिवस करत आहेत. परंतु, एका वृद्ध महिलेची मेडिकल चेकअप करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदोर (Indore) येथील टाटपट्टी बाखलमध्ये (Tatpatti Bakhal) घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनेकांवर कारवाई करत तेथील लोकांवर नियंत्रण मिळवले आहे. यापरिसरात अनेक लोक बाहेरून आले आहेत. यामुळे येथील नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. इंदोर येथे आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 63 वर पोहचली आहे. तर, 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार माजला होता. देशात सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच इंदोर येथील घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. इंदोर येथे आरोग्य विभागाची एक टीम एका वृद्ध महिलेची तपासणी करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि वाद घालू लागले. यातून नागरिकांनी थेट डॉक्टरांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक बाहेर देशातून आले आहेत. यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्यामुळे डॉक्टरांची एक टीम इंदोर येथे दाखल झाली होती. परंतु, त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तणूकीमुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हे देखील वाचा- COVID-19: कल्याण येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज; पती-पत्नीसह 3 वर्षाची मुलगी कोरोनामुक्त

एएनआयचे ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 9 लाख 35 हजार 584 वर पोहचली आहे. यांपैकी 47 हजार 206 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 94 हजार 260 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 834 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 144 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 338 वर पोहचली आहे. यात 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 41 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.