Pulses Prices: पुढील महिन्यापासून किचनच्या बजेटमध्ये होऊ शकते घट; हरभरा, तूर आणि उडीद डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता
मूग आणि मसूरच्या दराची स्थिती समाधानकारक आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतही मान्सूनच्या पावसाचा किरकोळ बाजारभावावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
Pulses Prices: तूर (Tur), हरभरा (Cicers) आणि उडीद डाळींचे भाव पुढील महिन्यापासून कमी होण्याची शक्यता असून चांगला मान्सून आणि आयात वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले की, डाळींच्या किमतींबाबत घाबरण्याची गरज नाही. पुढील महिन्यापासून या तिन्ही डाळींच्या आयातीतही वाढ होईल ज्यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढण्यास मदत होईल.
खरे यांनी सांगितले की, तूर, हरभरा आणि उडीद डाळींचे भाव गेल्या सहा महिन्यांत स्थिर असले तरी उच्च पातळीवर आहेत. मूग आणि मसूरच्या दराची स्थिती समाधानकारक आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतही मान्सूनच्या पावसाचा किरकोळ बाजारभावावर सकारात्मक परिणाम होणार आहे. सरकारने बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी सुरू केली असून 35,000 टन कांद्याची खरेदी झाली आहे. कोल्ड स्टोरेज आणि इरॅडिएशन प्रक्रियेद्वारे कांद्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे. (हेही वाचा -WPI Inflation Data: भारताचा महागाईचा दर मे महिन्यात 2.61% वर पोहोचला)
डाळींचे सरासरी भाव -
13 जून रोजी चणा डाळ 87.74 रुपये प्रति किलो, तूर डाळ 160.75 रुपये प्रति किलो, उडीद डाळ 126.67 रुपये प्रति किलो, मूग डाळ 118.9 रुपये आणि मसूर डाळ 94.34 रुपये प्रति किलो होती. ग्राहक व्यवहार विभाग देशातील 550 प्रमुख ग्राहक केंद्रांमधून खाद्यपदार्थांच्या किरकोळ किमती गोळा करतो. जुलैपासून तूर, उडीद, हरभरा यांचे भाव उतरण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मान्सूनच्या सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला असून त्यामुळे कडधान्य लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय सुधारणा होईल. शेतकऱ्यांना चांगले बियाणे देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
खरे यांनी पुढे सांगितलं की, देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल. 'भारत चना डाळ' 60 रुपये किलो दराने विकण्याची सरकारची योजना सर्वसामान्यांना दिलासा देत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. देशांतर्गत उपलब्धतेला चालना देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, यावरही त्यांनी भर दिला.
जागतिक पुरवठादार तसेच देशांतर्गत किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि मोठ्या किरकोळ साखळींच्या आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि साठेबाजी होणार नाही याची खात्री करण्यासाठी विभातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताने गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 8 लाख टन तूर आणि 6 लाख टन उडीद आयात केले. म्यानमार आणि आफ्रिकन देशांतून भारतात डाळींची प्रामुख्याने निर्यात होते.