किसान क्रांती यात्रा: दिल्लीत शेतकऱ्यांवर बळाचा वापर; पोलिसांकडून लाठीहल्ला, पाण्याचा मारा
गांधी जयंतीदिवशी राजधानी दिल्लीत दाखल होऊ पाहात असलेल्या हजारो शेतकऱ्यांवर दिल्ली पोलिसंनी बळाचा वापर केला. हे सर्व शेतकरी विविध मागण्यांची पूर्तता व्हावी या मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन करत होते. या आंदोलनाचाच भाग म्हणून हे शेतकरी 23 सप्टेंबरला हरिद्वार येथून निघाले. आज ते राजधानी दिल्लीत पोहोचत होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आणि पोलीस यांच्या जोरदार संघर्ष झाला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्च आणि पाण्याचा मारा केल्याचे समजते. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर घडला.
प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आंदोलनासाठी आणि दिल्लीत दाखल होण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे प्रवेशबंदी असतानाही शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करु पाहात होते. या वेळी दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना आढवले. दरम्यान, या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, या सर्व शेतखऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यासाठी मान्यता द्यायला हवी होती.
दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने भाजप सरकारने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाईलाज झाला आहे. म्हणूनच तो आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला असल्याची टीका केली. शेतकरी सरकारकडे आपल्या कष्टाचे दाम मागतो आहे. पीक विम्याचा परतावा मागत आहे. पण, सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असाही आरोप यादव यांनी केला आहे.