Baba Ka Dhaba चे मालक Kanta Prasad यांनी दिल्लीमध्ये सुरू केलं नवीन रेस्टॉरंट; पहा फोटोज

लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आलेल्या 'बाबा का ढाबा' चे मालक कांता प्रसाद यांनी दिल्लीमध्ये एक नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.

Kanta Prasad. (Photo Credits: Twitter | ANI)

Baba Ka Dhaba: लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आलेल्या 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) चे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी एक नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. हे रेस्टॉरंट दिल्लीच्या मालवीय नगर (Malviya Nagar) मध्ये सुरू करण्यात आले आहे. 80 वर्षीय कांता प्रसाद यांनी प्रत्येकास त्याच्या रेस्टॉरंटमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. नवीन रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर कांता प्रसाद यांनी सांगितलं की, "आम्ही खूप आनंदी आहोत, देवाने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आम्हाला देऊ केलेल्या मदतीसाठी मला लोकांचे आभार मानायचे आहेत. मी त्यांना माझ्या रेस्टॉरंटमध्ये येण्याचे आवाहन करतो. आम्ही या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना भारतीय आणि चाइनीज पदार्थांची सेवा देऊ. " सध्या सोशल मीडियावर कांता प्रसाद यांच्या नव्या ढाब्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कांता प्रसाद यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ते भीतीमय जीवन जगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मिळालेल्या धमक्यांमुळे त्यांना घर सोडणं कठीण झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. (हेही वाचा - PM Narendra Modi यांचे Gautam Adani च्या पत्नीसमोर हात जोडून अभिवादन? जाणून घ्या वायरल फोटोमागील सत्य)

याशिवाय जिवे मारण्याबरोबरचं त्यांचा ढाबा जाळण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे त्यानी म्हटलं होते. काही लोकांना त्यांच्या प्रसिद्धीचा हेवा वाटू लागला आहे. सततच्या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या कांता प्रसाद यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याददेखील नोंदवली होती. पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर नोंदविला नाही. परंतु, तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

लॉकडाऊन दरम्यान धंदा न झाल्यामुळे 'बाबा का धाबा' चे मालक कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्याव लागलं. त्यांच्याकडे एकवेळच्या जेवणासाठीदेखील पैसे नव्हते.

यानंतर, यूट्यूबर गौरव वासनने 'बाबा का ढाबा'च्या मालकाचा व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूबवर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोक ढाबा मालकाच्या मदतीसाठी पुढे आले. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर ढाबा मालक कांता प्रसाद यांनी गौरव वासन यांच्याविरूद्ध पैशांचा गैरवापर केल्याची तक्रार दाखल केली होती.