Black Magic: सरकार वाचावे म्हणून जेडीएस करत आहे जादू टोना? जेष्ठ नेते लिंबू घेऊन फिरताना आढळले; भाजप चा आरोप
सत्ता टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न झाल्यावर कॉंग्रेस-जेडीएसच्या काही नेत्यांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला आहे.
कर्नाटकमध्ये (Karnataka) सत्ता संघर्षाचे सत्र एखाद्या सिरीयलच्या एपिसोड्स प्रमाणे वाढत आहे. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार त्यानंतर आज सोमवारी तरी मुख्यमंत्री कुमारस्वामी (HD Kumaraswamy) बहुमत सिद्ध करू शकतील का, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी भाजपकडून बी. एस. येडियुराप्पा, कॉंग्रेसकडून सिद्धरामय्या, सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी असे तीनही मोठे नेते बोलत असताना आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु ठेवले. यामुळे सभागृहाचे कामकाज नाईलाजाने थांबवण्यात आले. त्यावर आज निर्णय होणार आहे. दरम्यान जेडीएस (JDS) आपली सत्ता राहावी म्हणून भाजपवर (BJP) काळी जादू करत आहे असा आरोप कर्नाटक भाजप च्या काही नेत्यांनी केला आहे.
सत्ता टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न झाल्यावर कॉंग्रेस-जेडीएसच्या काही नेत्यांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला आहे. जेडीएसचे नेते एच.डी. देवेगौडा यांनी शृंगेरी शारदा पीठाला भेट दिली. तसेच इतरत्रही अनेक पूजा, होम हवन चालू आहेत. अनिष्ट शक्ती दूर राहून आपले सरकार वाचावे, यासाठी कुमारस्वामी यांचे भाऊ एच.जी, रेवण्णा यांनी अनवाणी चालण्याचे व्रत घेतले असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेत ते लिंबू घेऊन आलेले अनेकांनी पहिले आहे. याच आधारावर जेडीएस काळी जादू करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. (हेही वाचा: कुमारस्वामी सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका; विधानसभा अध्यक्ष घेणार आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय)
दरम्यान, एका ज्योतिषाने सांगितल्यामुळेच कुमारस्वामी मुद्दाम बहुमत सिद्ध करण्यास उशीर करत आहेत, असाही भाजपचा आरोप आहे. मंगळवारी बहुमत सिद्ध होण्याची शक्यता अधिक आहेत असे त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र कुमारस्वामी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एच.जी, रेवण्णा यांना स्वतः जवळ लिंबू बाळगल्याने मानसिक आधार मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच आपण कोणत्याही ज्योतिषाचा सल्ला घेतला नाही, या सर्व भाजपने रचलेल्या कहाण्या आहेत असे कुमारस्वामी म्हणाले. असो, सत्ता लालसेमुळे नेते कोणत्या थराला जातात हे आपण पहिले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कुमारस्वामी कसे आणि कधी आपले बहुमत सिद्ध करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.