Bihar: आश्चर्यकारक! गोपालगंज कारागृहातील कैद्याने गिळला मोबाईल; प्रकृती खालावल्यानंतर एक्स-रे रिपोर्ट पाहून डॉक्टर झाले अवाक
या कैद्याला पीएमसीएच पाटणाला चांगल्या उपचारांसाठी रेफर केले जाईल. या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Bihar: बिहारमधील गोपालगंज (Gopalganj) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहातील एका कैद्याने पकडले जाण्याच्या भीतीने चक्क मोबाईल गिळला. फोन गिळल्यानंतर काही वेळातच कैद्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्याला शहरातील रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. डॉक्टरांना एक्स-रे रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात मोबाईल असल्याचे आढळून आले. कैद्याची चौकशी केली असता त्याने भीतीपोटी मोबाईल गिळल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या.
कॅशर अली असे या कैद्याचे नाव आहे. तो नगर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदरवा रफी गावातील रहिवासी बाबू जान मियाँ यांचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा कैदी बऱ्याच दिवसांपासून गोपाळगंजच्या चनावे कारागृहात बंद आहे. त्याला दुखू लागल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने कैद्याला सदर रुग्णालयात नेले. डॉक्टरांना एक्स रेमध्ये त्याच्या पोटात फोन दिसला. एक्स-रे रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरही अचंबित झाले. मात्र बरीच विचारपूस केल्यानंतर कैद्याने घाबरून मोबाईल गिळल्याचे सांगितले. (हेही वाचा -Uttar Pradesh Shocker: लग्नावेळी चक्क रसगुल्ल्याच्या भांडणातून एकाची हत्या, तीन जणांवर गुन्हा दाखल)
सध्या कैद्याच्या ऑपरेशनसाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात येत आहे. या कैद्याला पीएमसीएच पाटणाला चांगल्या उपचारांसाठी रेफर केले जाईल. या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 17 जानेवारी 2020 रोजी नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कैशर अलीला हाजियापूर गावाजवळून अंमली पदार्थांसह अटक केली होती.
कैशर याआधीही अनेकदा तुरुंगात गेला आहे. मोबाईल गिळल्याची घटना अनोखी असली तरी कैशर अटक होण्याची ही पहिलीच घटना नाही. कैद्याला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यामुळे वेळेवर सर्व प्रकार उघडकीस आला.