Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी, त्या सरकारला अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी सादर करणे बंधनकारक असते. हे बंधन घटनेने घालून दिले आहे. अर्थसंकल्पाचेह दोन प्रकार असतात. एक महसूली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प.

Nirmala Sitharaman & Union Budget 2020 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

What is a Budget: नेहमीच येतो पावसाळा या उत्कीप्रमाणे नेहमीच येतो अर्थसंकल्प असे अनेकांना वाटू शकतं. परंतू, अर्थसंकल्प हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. वरवर पाहता आपण आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. जसे की, अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? अर्थसंकल्प कोण सादर करते?, भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?, अर्थसंकल्प प्रस्ताव केव्हापासून लागू होतो? वैगेरे.. वैगेरे. म्हणूनच या प्रश्नांबाबत थोडक्यात माहिती आम्ही येथे आपल्याला देतो आहोत. देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापले अर्थसंकल्प सादर करत असतात. या लेखात आपण केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत चर्चा करत आहोत.

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?

केंद्रीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी संसदेत सादर केला जातो. यात आगामी आर्थिक वर्षातील गुंतवणूक, खर्च आणि अपेक्षीत महसूल याबाबत केंद्र सरकारचे धोरण आणि तरतूद यांसबंधीचा ताळेबंद असतो. हे साधारण असे असते जसेकी एखाद्या कुटुंबाचा महिन्याच्या गृहखर्चाचा तपशील आगोदर काढला जातो.

अर्थसंकल्प केव्हा सादर केला जातो?

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून अर्थसंकल्प मांडण्याची तारीख नेहमीच बदलत आली आहे.परंतू, 2017 पासून केंद्र सरकारने निर्णय घेतला की, प्रत्येक वर्षाच्या 1 फेब्रुारीला वार्षिक अर्थसंकल्प सादर केला जाईल. या आधी हा अर्थसंकल्प शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात असे.

अर्थसंकल्प कोण सादर करते?

केंद्रीय अर्थसमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात. त्यामुळे अनेकदा या पदावर असलेल्या व्यक्ती बदलल्याने वेगवेगळ्या व्यक्ती हा अर्थसंकल्प सादर करतात. काही सरकारमध्ये एकच व्यक्ती दीर्घकाळ अर्थमंत्री पदावर कार्यरत असतो. अशा वेळी अशा व्यक्तीस केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी आणि संधी एकापेक्षा अधिक वेळ मिळू शकते. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यंदाही अर्थमंत्री त्याच असल्याने अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. (हेही वाचा, Union Budget 2020: Income Tax कपात, विविध सवलतींसह अर्थसंकल्प २०२० मध्ये केंद्र सरकार विमा क्षेत्राला काय गिफ्ट देणार? जनतेला अपेक्षा)

भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला?

शनमुखम चेट्टी हे स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यामुळे स्वतत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प शनमुखम चेटी यांनी 26 नोव्हेंबर 1947 या दिवशी सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची समिक्षा होती. त्यामुळे यात नवे कर अथवा इतर विषयांवर या अर्थसंकल्पात भाष्य नव्हते.

अर्थसंकल्पीय तरतूद केव्हापासून लागू होते?

केंद्रीय अर्थसंकल्पात लागू असलेल्या तरतुदी 1 एप्रिलपासून लागू होत असतात. भारताचे नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरु होते. हे वर्ष पुढच्या वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत लागू असते.

सरकार दरवर्षी अर्थसंकल्प सादर करत असते. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी, त्या सरकारला अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी सादर करणे बंधनकारक असते. हे बंधन घटनेने घालून दिले आहे. अर्थसंकल्पाचेह दोन प्रकार असतात. एक महसूली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प. महसूली अर्थसंकल्पात कर असलेला आणि कर नसलेल्या महसूलावर भाष्य केले जाते तसेच खर्च आणि त्याबाबतच्या निर्णयांना मान्यत्या दिलेली असते. तर, भांडवली अर्थसंकल्पात भागिदारी, गुंतवणूक, मालमत्ता निर्मिती, भांडवल अशा गोष्टींचा अंतर्भाव असतो.